१८ ऑगस्ट रोजी होणार मतदान, अनेक इच्छुकांचे देव पाण्यात…
अमळनेर:- नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगाने जाहीर केला असून उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे.
२८ जुलै पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत असून ४ ऑगस्ट पर्यंत माघारीची मुदत दिली आहे. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी १९ रोजी मतमोजणी होणार आहे. आता ४० दिवसांचा अवधी उरल्याने विद्यमान व इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीत तालुक्यातील कोणते नेते पॅनल/आघाडी उभी करतात हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्व एकत्र होवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभार सुरू होता. मागील कार्यकाळात नगरपालिकेत ही ठराविक कालावधी नंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे दिसले. ते कश्यामुळे एकत्र आले हा भाग अलाहिदा, मात्र आता पर्यंत चालणारे हे “मिल बाट के” चे राजकारण पालिका निवडणूकीतही चालते की नेत्यांची फाटाफूट होते काही दिवसात कळेलच. मात्र थोडे का असेना कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
अनेक विद्यमान नगरसेवकांना लागली चिंता…
मागील पंचवार्षिक निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना आपले पद टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कोरोना काळात अनेक जण वार्डात नागरिकांना मदत करण्याऐवजी घरात बसून होते. अनेक वार्डात मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. कालावधी संपल्यावर अनेकांनी चमकोगिरी करत कामाची उद्घाटने सुरू केली. मात्र पाच वर्षाची निष्क्रियता सहा महिन्यात विसरेल एवढी जनता दुधखुळी नाही. गेल्या दोन तीन टर्मपासून निवडून आलेल्या पण निष्क्रिय असणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली तर नव्यांना संधी मिळणार आहे.