व्याख्यान व विविध कार्यक्रमांचे केले होते आयोजन…
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र हे आपला अनमोल ठेवा आहे. या केंद्राच्या माध्यमातून समाजाला दिशादर्शक ठरतील असे तत्वज्ञान विषयक उपक्रम व्हावेत. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य विद्यापीठाकडून निश्चितपणे देण्यात येईल असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले.
प्रताप तत्वज्ञान केंद्राचा १०६ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या निमित्त व्याख्यान व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप दादा पाटील, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.विजय कंची, केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार, विभाग प्रमुख प्रा.डॉ.राधिका पाठक व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्ताने केंद्राच्या परिसरात रोटरी क्लबच्या सहाय्याने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रोटरीच्या वतीने देण्यात आलेल्या आर.ओ.युनिटचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्रांच्या परिसरात रेन वाॅटर हार्वेस्टिंग करुन देणा-या गुजरात महिला हाउसिंग सोसायटीच्या अधिकारी व कर्मचारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर दिनानिमित्त केंद्राचे सल्लागार समिती सदस्य प्रा.डॉ. धीरज वैष्णव यांच्याकडून मातोश्री स्व.कुसूमबाई वैष्णव यांच्या स्मरणार्थ सेवा रुग्णालयास आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर युनिट मान्यवरांचे हस्ते भेट देण्यात आले. या वेळी बोलतांना दिलीपदादा पाटील म्हणाले की, मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे तत्वज्ञान देणारे हे एक केंद्र असून या संस्थेच्या विकासासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील राहील. समाजाच्या सकारात्मक विकासात अशा संस्थांचे योगदान आवश्यक व महत्त्वाचे असते असे मत त्यांनी व्यक्त केले.
तत्वज्ञानाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते प्रा.डॉ. विजय कंची यांनी आपल्या भाषणात प्रताप तत्वज्ञान केंद्राचा गौरवशाली भूतकाळ श्रोत्यांसमोर मांडला. श्रीमंत प्रतापशेठ यांनी भारतीय तत्वज्ञानाची महती जागतिक पातळीवर पोहोचावी या व्यापक हेतूने या केंद्राची स्थापना केली. आपले तन मन धन लावले. अनेक विद्वान येथे अभ्यासासाठी येऊन गेले. या संस्थेचा उज्वल भविष्यकाळ घडवणे आपल्या हाती आहे. या विषयातील विविध पैलूंवर आधारित कार्य या केंद्रात निरंतर सुरू रहावे त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत असे प्रा.डॉ.कंची यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र कुलगुरू प्रा.डॉ. एस. टी. इंगळे यांनी या केंद्राच्या आगामी कार्यक्रम व उपक्रमांना विद्यापीठ नेहमीच सहकार्य करेल. त्याबाबतचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.चंद्रकांत पाटील व अजय रोडगे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. दिलीप भावसार यांनी केले. तर सूत्रसंचालन दिनेश नाईक व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.धीरज वैष्णव यांनी केले. कार्यक्रमास खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, संचालक डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,माजी कार्याध्यक्ष गोविंद मुंदडे,अजय केले, माजी प्राचार्य डॉ. एस.आर. चौधरी, डॉ. ए. एम. जैन, रोटरी क्लबचे अध्यक्ष किर्ती कोठारी, सेक्रेटरी ताहा बुकवाला,सर्व सदस्य,प्राचार्य डॉ.शिरूडे, प्रा.धर्मसिंह पाटील,प्रा.प्रतिक्षा कुलकर्णी, अभिजीत भांडारकर आदींसह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.