सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथे सालाबादप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशी दिनी विठ्ठल रुखमाईच्या पालखीची दिंडी काढण्यात येते. ही पालखी गरीबनाथाची पालखी म्हणून प्रचलित आहे. ह.भ.प.महाराज व बाल गोपाळांच्या टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात समस्त भोई बांधवांच्या खांद्यावर विठ्ठलाची पालखी एकादशी च्या पावन मुहूर्तावर उत्सवात निघाली. पातोंडा येथील मांडे कुटुंबातील नऊ पिढ्यातील वंशजांनी गावकऱ्यांच्या सहयोगाने घरात स्थापन केलेले छोटेखानी प्राचीन मंदिराची स्थापना साधारण 250 वर्षांपूर्वीचे असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. मंदिराची देखभाल व सेवा मांडे कुटुंबियांकडून केली जात असते. म्हणून ह्या मंदिराला प्रति पंढरपूराचे मंदिर म्हणून मान देत असतात.दरवर्षी मोठ्या उत्साहात लाकडी पालखीत विठ्ठल रुखमाईची सुरेख अशी मूर्ती बसवून टाळ, भजन, मृदुगांच्या गजरात संपूर्ण गावात फिरवली जाते. पालखीचा खांद्याचा मान गावातील भोई समाजाला आजपर्यंत मिळत आलेला असून गावातील सर्व भाविक पालखीची पूजा अर्चा करून विठू माऊलीचे दर्शन व आशीर्वाद प्राप्त करून घेतात. सायंकाळी मंदिरातून पालखी निघून गावात मिरवण्यात आली. यावेळी दक्षिणमुखी भजनी मंडळाचे जेष्ठ सदस्य,भोई समाज बांधव,बाळ गोपाळ व समस्त भाविक गण पालखी सोहळ्यात उपस्थित होते.