चार जणांविरुद्ध मारवड पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- नगर जिल्ह्यातील एकास जबरदस्ती विष पाजत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेंद्र शिवाजी उदगे मूळ रा. सुसरे ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांचा जेसीबीचा व्यवसाय असून तालुक्यातील मांडळ येथे व्यवसायासाठी भाड्याने खोली घेवून राहत होता. गेल्या दीड वर्षापासून ही खोली बंद असून ८ ऑगस्ट रोजी जीवितास धोका असल्याने मारवड पोलिसांची मदत घेण्यासाठी येत असताना खेडी गोवर्धन रस्त्यावर दोन दुचाकीने येत सुरेश रामचंद्र धनगर, दीपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर, किशोर धनगर यांनी चापटाबुक्क्यानी मारहाण करीत खिश्यात असलेली बाटली काढत काहीतरी विषारी औषध जबरदस्तीने पाजले. त्यानंतर लोक येत असल्याने फिर्यादीस तिथेच सोडून पळून गेले. छातीत जळजळ होत असल्याने फिर्यादीने मारवड पोलीस ठाण्यात जावून हकीगत सांगितली. तब्येत खराब होत असल्याने पोलीस अंमलदार यांनी त्यास मारवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारकामी फिर्यादीस धुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर योगेंद्र याने मारवड पोलीसात मांडळ येथील सुरेश रामचंद्र धनगर, दीपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर व फागणे येथील किशोर धनगर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सपोनि जयेश खलाने हे करीत आहेत.