अमळनेरला शनिवारी होणार “वारी यूपीएससी”ची उपक्रमाची सुरुवात…
अमळनेर– आजच्या तरुणाईला गुन्हेगारी प्रवृत्तीकडून स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी व यूपीएससी ची जनजागृती करण्यासाठी “वारी यूपीएससीची” हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात दरवर्षी यूपीएससी उत्तीर्ण होणारे भावी आयएएस, आयआरएस व आयपीएस अधिकारी हे या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक विचार पोचविण्याचे काम २०१७ पासून करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्यात “वारी यूपीएससी”ची या उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयात मार्गदर्शन होणार आहे. गेल्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत ऑल इंडिया रँक २२६ मिळवून आयएएस पदी निवड झालेले अभिजीत पाटील (पातोंडा ता.चाळीसगांव ह.मु.धुळे) व ऑल इंडिया रँक ४६२ संपादन करून आयपीएस पदी विराजमान झालेले देवराज पाटील (धुळे) हे विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवारी (ता.१३) सकाळी नऊला अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील अध्यक्षस्थानी राहतील. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी पि डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना वाडीले, संस्थेचे मानद संचालक प्रा. सुनील गरुड, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी पी चौधरी, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य के बी बाविस्कर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्य गायत्री भदाणे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सुदीप पाटील, आर्मी स्कुलचे प्राचार्य पी एम कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर सकाळी अकराला प्रताप महाविद्यालयात वारी पोहचणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या पूज्य साने गुरुजी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी हे अध्यक्षस्थानी राहतील. संस्थेचे कार्यपाध्यक्ष योगेश मुंदडे, संस्थेचे संचालक प्रदीप अग्रवाल, डॉ संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, नीरज अग्रवाल, डॉ अनिल शिंदे, चिटणीस प्रा डॉ ए बी जैन, प्राचार्य डॉ पी आर शिरोडे, प्रा डॉ जयेश गुजराथी, प्रा डॉ विजय तुंटे आदी उपस्थित राहतील. त्यानंतर बुधवारी (ता.१७) चाळीसगांव येथे सकाळी दहाला राष्ट्रीय विद्यालयात व पाचोरा येथे दुपारी अडीचला एम एम कॉलेज तर गुरुवारी (ता.१८) रोजी जळगांव येथे सकाळी दहाला नूतन मराठा कॉलेज तर मुक्ताईनगर येथे अडीचला संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी वारीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वारीत सहभागी होवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यापूर्वी यांनी केले होते मार्गदर्शन…
वारी यूपीएससी या उपक्रमांतर्गत २०१७ पासून विविध जिल्ह्यांमध्ये विविध महाविद्यालयात व्याख्यान होत आहेत यात युवा खेलमंत्रालयाचे सहायक सचिव सौरभ सोनवणे , जलशक्ती मंत्रालयाचे सहायक सचिव महेश चौधरी , सहायक सचिव आशिष पाटील , २०१८ मध्ये पुरी , ओडिसाचे सहायक जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी , मयुरभंजचे सहायक जिल्हाधिकारी भुवनेश पाटील, २०१९ मध्ये यांनी आयएएस अधिकारी मनोज महाजन यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केले होते.