रुक्मिणीताई महिला महाविद्यालयात १९ ऑगस्टपासून आयोजन…
अमळनेर:- छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती (नवी दिल्ली) यांच्या मार्फत शुक्रवारपासून (ता.१९) सहा दिवसीय प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात सकाळी दहाला ही व्याख्याने होणार आहेत.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी दहाला प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ. एस ओ माळी यांचे “मला अधिकारी व्हायचं” या विषयावर पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. शनिवारी (ता.२०) सकाळी दहाला विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे इंग्रजी शिक्षक उमेश काटे यांचे “यूपीएससी एमपीएससी म्हणजे काय?” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता.२२) सकाळी दहाला पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचे “स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी” या विषयावर तर मंगळवारी (ता.२३) सकाळी दहाला महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्याम पवार यांचे “स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बुधवारी (ता.२४) सकाळी दहाला महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मंजुषा खरोले यांचे “स्पर्धा परीक्षेत महिलांची वाढती संख्या” या विषयावर तर गुरुवारी (ता.२५) सकाळी दहाला महिला महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक सुनील वाघमारे यांचे “स्पर्धा परीक्षेत इतिहासाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुक्मिणीताई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख व उपप्राचार्य प्रा. श्याम पवार यांनी केले आहे.