प्रांताचे पत्र देत पोलीस निरीक्षक व नायब तहसिलदारांच्या हस्ते सोडले उपोषण…
अमळनेर:- वडिलोपार्जित शेतीवर वडील मेल्यावर ही ७/१२ उताऱ्यावर वारसदार म्हणून नोंद होत नसल्याने न्याय मिळावा म्हणून पाडळसरे येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी विधवा आईसह कुटुंबीय दिनांक १ रोजी शेतातच तंबू गाडून उपोषणाला सुरुवात केली, त्या आधीच त्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता , त्याची दखल प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी तात्काळ घेऊन नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना उपोषणस्थळी पत्र पाठवून न्यायप्रविष्ट बाब असल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा चालू असून राज्य शासनाकडे किंवा न्यायालयात दाद मागावी म्हणून सूचित करून प्रशासनाला वेळ द्यावा म्हणून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार उपोषणकर्त्यांनी नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
पाडळसरे शिवारातील गट नंबर ८७/२ मधील ३ हेक्टर ४५ आर या वडिलोपार्जित आजोबांची शेतजमिन आजोबा मयत झाल्यावर मंडळ अधिकारीच्या मदतीने दोन भाऊंनी वाटणी करून नावे लावून घेतली. काशिनाथ चिमण पाटील यांचे नाव आजतागायत उताऱ्यावर लावण्यात आले नाही, यावरून वाद निर्माण होऊन हाणामाऱ्या झाल्या त्यात काशिनाथ चिमण पाटील मयत झाले तरी वारसदार म्हणून उताऱ्यावर नोंद झाली नाही म्हणून दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ३१ तारखेपर्यंत उताऱ्यावर वारसदार म्हणून नावे लावण्याची मागणी केली, मागणी मान्य झाली नाहीतर १सप्टेंबर पासून शेतातच उपोषणाचा बसण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार आज सकाळी अर्जदार ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, विधवा आई यशोदाबाई काशिनाथ पाटील व विधवा भावजयी नंदा रमेश पाटील यांनी तंबू गाळून उपोषणा सुरुवात केली. मात्र प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी तात्काळ दखल घेऊन प्रकरणाची तपासणी करून वरील विषयी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित बाब न्यायप्रविष्ट असल्याने शासन किंवा न्यायालयात न्याय मागता येईल म्हणून सूचित करून प्रशासनाला वेळ द्यावा म्हणून उपोषण मागे घ्यावे म्हणून पत्र घेऊन दुपारी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश खलाने , तलाठी जितेंद्र जोगी, पोलीस पाटील उमाकांत पाटील, विश्वास कोळी यांना उपोषणस्थळी पाठविले. पत्र नायब तहसीलदार यांनी वाचून दाखविले व पोलीस निरीक्षक यांनी उपोषण सोडण्याची साद घातली असता उपोषणकर्ते ज्ञानेश्वर पाटील, यशोदाबाई पाटील, नंदा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलीस निरीक्षक जयेश खलाने व नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्याहस्ते सरबत पाजून उपोषण सोडले.