
डीवायएसपी राकेश जाधवांनी घेतल्या ५०० च्या वर कार्नर सभा…
जनजागृती करत बसवले ४५० च्यावर सीसीटीव्ही कॅमेरे…

अमळनेर:- शहरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरेचे जाळे विणून डीवायएसपी राकेश जाधव यांनी गुन्हेगारीवर वॉच ठेवला आहे. यामुळे गुन्हे करताना आता गुन्हेगार विचार करून गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. वर्ष दीड वर्षात कॉलन्यांमध्ये, चौकांत तब्बल ५०० वर कार्नर सभा घेऊन नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्व पटवून देत लोकसहभाग वाढवला आहे. त्यामुळे आतापर्यंत अमळनेर शहरात ४५० वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती डीवायएसपी राकेश जाधव यांनी दिली.
अनेक शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत आजही गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र शहरातील गुन्हे आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा महत्वाचे असल्याचे महत्व नागरिकांना समजून सांगितल्यानंतर लोकसहभागातून काय होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण अमळनेरचे डीवायएसपी राकेश जाधव यांनी घालून दिले आहे. गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे पोलिस दलाचे काम असले तरी त्यात नागरिकांचा सहभाग असल्यास त्याचे फलीत काय होऊ शकते, हेही त्यांच्या या उपक्रमातून दिसून आले आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अमळनेर उपविभागाचा पदभार घेतला तेव्हा क्राईमचा रेशो जास्त होता. हे क्राईम कमी करण्यासाठी गुन्हेगार, आरोपी यांचा शोध लागत नव्हता. त्यात शहरात क्वचित सीसीटीव्ही होते. त्यात त्यांची कॅच करण्याची क्षमता कमी होती. हेच सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे असते तर गुन्हेगार स्पष्ट दिसता आणि शोध लावता येतात. त्यामुळे लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कल्पना सुचली आणि त्याला सुरवातही केली. सुरुवातीला चौकात, कार्नर सभा घेऊन प्रबोधन करून उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सुरुवातील गैरसमज नंतर पटले महत्व…
सुरुवातीला नागरिक खाकीला घाबरून पैसे द्यायचे. त्यामुळे ते मनाला पटत नव्हते. म्हणून नागरिकांच्या मनातील भिती प्रथम दूर केली. हे सामाजिक काम असून लोकसहभाग महत्वाचा असल्याचे पटवून द्यावे लागले. सामाजिक भावनेतून निधी मागितला. याच्याच विश्वासहार्यता राहवी म्हणून एकही पैसा हातात घेत नाही. तेथील नेतृत्व करणाऱ्या विश्वू व्यक्तीकडेच लोकसहभागातून गोळा होणाऱ्या रकमेची जबाबदारी दिली जाते. पैसे गोळा झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणाऱ्याला बोलवून ते बसवले जातात. यातही काही निधी देत नव्हते. ज्यांनी दिले त्यांचे स्वीकारले. पैसे खाऊन घेतात, असेही आरोप झाले. पण याकडे दुर्लक्ष केले. काम थांबवले नाही. जो देगा उसकाही भला न देगा उसकाही भला म्हणून काम सुरूच ठेवले आहे. आता त्याचे महत्वही पटू लागले आहे.
अर्बन बँकेच्या कॅमेराने दिला विश्वास…
सुरुवातीला शहरातील अर्बन बँकेत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्व पटवून दिले. त्यांना बँकेच्या बाहेरही कॅमेरेही लावण्यास सांगितले. त्यांनी त्यास प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे बँकेच्या मागील बाजूसही कॅमेरा बसवण्यास सांगितला. त्याची गरज नसल्याचे सुरुवातीला वाटले. परंतु बँकेने तोही बसवला आणि काही दिवसातच बँकेतून ६५ हजाराचे गोल्डलोन घेऊन गेलेल्या वृद्ध बँकेच्या मागील बाजूस लघुशंकेसाठी गेल्यावर एकाने त्यांना लुटल्याची घटना घडली. ही घटना त्या मागील बाजूच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने लुटारूला पकडण्यात पोलिसांना यश आले. येथूनच अभियान हे सक्षमपणे राबवण्याचा विश्वास मिळाला आणि ते सुरू केले आहे.
३२ ते ६४ जीबीचे डिव्हीआर…
शहरातील कोणत्याही भागात गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार हा कोणत्याही भागातून जात असला तरी तो शहरातील मुख्य चौकात, खासगी प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. त्यात पैलाड, बसस्थानक, गांधलीपुरा, झांमी चौक, महाराणा प्रताप चौक, ढेकू रोड आदी ठिकाणी कॅमेऱ्यांचे फुटेजसाठी डिव्हीआर ठेवले आहेत. ते ३२ ते ६४ जीबीचे हे डिव्हीआर आहेत. हे कॅमेर चांगल्या आयपीचे असल्याने दुचाकी, चारकीचाचा नंबरही कॅच करते. त्यामुळे गुन्हेगारांना आता गुन्हा करताना धडकी भरू लागली आहे.
डिव्हीआरची गुप्तता…
गुन्हेगारही शातीर असतात. चोरी किंवा गुन्हा करताना पुरावे मिळू नयेत म्हणून ते सीसीटीव्ही कॅमेरा फोडून डिव्हीआरही चोरून घेऊन जातात. त्यामुळे कॉलनी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्याचा डिव्हीआर कोणाकडे बसवला आहे, याची माहिती गुप्त ठेवली जात आहे. त्यामुळे त्या कॉलनीत चोरी झाली तरी डिव्हीआर चोरीला जाण्याची भिती नाही. त्यामुळे गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत होऊन नागरिकही सुरक्षित राहत आहेत.
९० टक्के गुन्हेगारीला चाप…
सुरवातीला अमळनेर शहरात गुन्हेगारीचा रेशो जात असल्याने कॅमेर बसवल्यानंतर आता गुन्हेगारी ८० ते ९० टक्के गुन्हेगारी कमी झाली आहे. त्यात चेन स्नॅचींग, मोटरसायकील चोरीचे प्रमाणही कमी झाले आहे. गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाणही ९० टक्के आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा सीसीटीव्हीमुळे पोलिस अधिकाऱ्यांना दोन ते आठ दिवसात सापडतोच. लवकर आरोपी सापडल्यामुळे चोरीला गेलेला मुद्देमाल मिळतो. तो मुद्देमाल संबधितांना देण्यासाठी प्रयत्न असतो.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुरक्षेची हमी…
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे व्यापारी सुरक्षित झाले. त्यांच्यासह नागरिकांमध्ये कोणतीही भिती राहिलेली नाही. शाळा, क्लाससाठी बाहेर पडणारे पाल्य सुरक्षित आहे. अपहरण आणि त्यातून खंडणीचे गुन्हे, छेडछाड होत नाही. अश्लिल चाळे, पळून जाण्याचे प्रकार थांबले आहे. पोलिसांवरही वचक राहील. त्यांच्याकूडन चुकीच्या कामासाठी पैसे मागणे कमी होईल, पारदर्शकता येईल. मंदिर, मशिद, शाळा, बंगले, मेडिकल, दवाखाने हे सुरक्षित झाले. खोटे गुन्हे दाखल बंद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आणखी काढू मार्ग…
शहरातील अजून काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बाकी आहे. लोकसहभागातून जेवढे काम होईल, तेवढे करूच पण या कामाला अधिक गती देण्यासाठी नगरपालिका, बांधकाम व महसूलची बैठकी घेऊन अन्य ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मार्ग काढू, अमळनेर सीसीटीव्हीमय झाले पाहिजे, असा मानस आहे, असेही राकेश जाधव यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींचे काम डीवाएसपींनी केले…
शहरात अनेक आमदारांच्या काळात शांतता समितीच्या झालेल्या बैठकीत नेहमीच सीसीटीव्ही कॅमेरेचा विषय चर्चिला जात होता. प्रत्येकजण लाखोंचा निधी जाहीर करायचे नव्याचे नऊ दिवस म्हणून त्यावर यंत्रणा राबायची. पण सीसीटीव्ही कॅमेरे कधीच बसले नाहीत. मात्र डीवायएसपी राकेश जाधव यांनी हेच काम लोकसहभागातून उत्तम प्रकारे उभे केले आहे. एवढ्या वर्षात लोकप्रतिनिधींना जमले नाही तेच काम डीवायएसपी जाधव यांनी करून दाखवले. सीसीटीव्ही बाबत यंत्रणा राबयची जे त्यांना करता आले नाही ते डीवायएसपींनी करून दाखवल्याने सर्वसमान्यांतून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
चोपडा, पारोळा, ग्रामीण भागातही उपक्रम…
डीवायएसपी जाधव यांनी अमळनेर शहरातच नव्हे तर चोपडा आणि पारोळा शहरातही लोकसहभागातून उपक्रम राबवणार आहेत. तसेच अमळनेर तालुक्यातील सुंदरपट्टी, गलवाडे, लोण आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. यासाठी सरपंच, शाळा संपर्कात आहेत. ग्रामपंचायतला अधिकार आहे. त्यामुळे ग्रामीण भागही सीसीटीव्हीत कव्हर होणार आहे.







