माघारीनंतर उर्वरित गावात चित्र होणार स्पष्ट…
अमळनेर:- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याची अंतिम दिनांक होती. २४ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
बाम्हणे व निमझरी येथील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून गावकऱ्यांनी सामंजस्याने सरपंच व सदस्य पदासाठी एकेकच अर्ज दाखल केले. बाम्हणे येथे सरपंच पाडी प्रतिभा पाटील व निमझरी सरपंच पदी पंकज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सदस्य पदासाठी एकेकच अर्ज दाखल करून सदस्यांची निवड ही बिनविरोध करून उर्वरित गावांसमोर आदर्श ठेवला आहे.
माघारी नंतर उर्वरित गावात चित्र होणार स्पष्ट…
अनेक गावात एका जागेसाठी तीन ते चार अर्ज आले असून अनेक नवश्या गवश्यांनी ही गर्दी केली आहे. तरुणांना संधी देणे क्रमप्राप्त असताना जुने जाणते अद्यापही आपली खुर्ची सोडायला तयार नसून दोन तीन वेळा निवडून आल्यावर तर काहींची हयात ग्रामपंचायतीत गेली असली तरीही अनेकांची हौस भागली नसल्याने त्यांनीही अर्ज दाखल केले आहे. अनेक नवीन व तरुण उमेदवारांनी ही आपले अर्ज दाखल केले असून ते जुन्यांच्या दबावापुढे माघार घेतात की आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक गावात सामंजस्याने निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र त्याला यश आले नाही. एकंदरीतच माघारी नंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.