शिक्षक उमेश काटे यांचा उपक्रम जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात यशस्वी…
अमळनेर- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “लेखन कौशल्य” विकसित करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या युगात विविध “रिल्स” तयार करण्याच्या बोलबाला आहे. या कौशल्यालाही सकारात्मक गोष्टीकडे वळवले तर विद्यार्थी हित साधले जाईल. यासाठी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेला “लेखन कौशल्य” व “व्हिडिओग्राफी” (छायाचित्रण) या छंदाचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभूतीचा नवोपक्रम लक्षवेधी ठरत आहे.
नुकताच हा उपक्रम येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात यशस्वीरीत्या राबविण्यात आला. विशेष म्हणजे पुढील महिन्यात धुळे येथे होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनातही हा उपक्रम राबविला जाणार आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘अहवाल लेखन’, वृतांत लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन शिकवले जाते, मात्र याची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत नाही. हा अनुभव यावा या उद्देशाने ३ व ४ डिसेंबर ला म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत म. वा. मंडळ (अमळनेर) आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात तालुक्यातील निवडक शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक संघ सहभागी झाला. या संघाने दोन दिवसीय साहित्य संमेलनात प्रत्येक बाबींच्या नोंदी आपल्याकडे केल्या. साहित्य संमेलनाचे उद्घाटन, संमेलनाध्यक्षांचे भाषण, स्वागत अध्यक्ष यांचे मनोगत, कवी संमेलन, कवी कट्टा, परिसंवाद कथाकथन, साहित्यिक- श्रोते यांच्या प्रतिक्रिया अशा सर्व बाबींच्या नोंदी अहवाल लेखनच्या माध्यमातून आपल्याकडे घेतल्या. या सर्व नोंदी एकत्रित करून साहित्य संमेलन समारोपाच्या पूर्वी हा संपूर्ण “अहवाल प्रस्ताव हस्तलिखित स्वरूपा” मध्ये सादर करण्यात आला. यातील विजेता शाळेला “जिल्हास्तरीय लेखन कौशल्य साहित्य पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले. सोशल मीडियाच्या या युगात इलेक्ट्रॉनिक मीडियालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. काळाची पाऊले ओळखत “छायाचित्रण कौशल्य” ही विकसित करण्याची सुवर्णसंधी या साहित्य संमेलनात या नवोपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षणांची चित्रणे टिपली. उद्घाटनाचे भाषण, ग्रंथदिंडी, कवी कट्टा, सहभागी साहित्यिक- श्रोते यांचे बाईट्स (प्रतिक्रिया) घेऊन त्यांची एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली. चांगली व्हिडिओ क्लिप तयार करणाऱ्या शाळेच्या संघालाही “जिल्हास्तरीय छायाचित्रण कौशल्य साहित्य पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, कवी वि दा इंगळे, प्रा डॉ नरेंद्र पाठक यांनी या साहित्य संमेलनात या उपक्रमाचे आपल्या भाषणातून कौतुकही केले. यासाठी डॉ. अविनाश जोशी, कवी रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, प्रा डॉ एस ओ माळी, प्रा डॉ.एस आर चौधरी, आत्माराम चौधरी, संदीप घोरपडे, सुनील पाटील, अनिता बोरसे, सीमा सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, डी ए धनगर, रामकृष्ण बाविस्कर, मनोहर नेरकर, डॉ. कुणाल पवार, दत्तात्रय सोनवणे, शरद पाटील, रत्नाकर पाटील, वाल्मिक पाटील, सुनीता पाटील, गोपाल हडपे, उमेश महिंद यांचे सहकार्य लाभले.
नवोपक्रम ठरत आहे फायदेशीर!
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख व्हावी तसेच मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात यावे यासाठी पाठपुस्तकात ‘वाचा’, ‘चर्चा करूया’, ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील हे विविध ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांतुन मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता यावे. तसेच भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. या नवनिर्मितीचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी हा “लेखन कौशल्य” व “छायाचित्रण कौशल्य” हा नवोपक्रम यशस्वी ठरत आहे. रोजच्या जीवनात विद्यार्थी हे तंत्रज्ञानाचा वापर करतातच. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा तसेच ‘मैत्री तंत्रज्ञानाशी या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारात यावा यासाठी ही हा नवोपक्रम फायदेशीर ठरत आहे.
प्रतिक्रिया….
धुळे येथे पुढील महिन्यात सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे. अहिराणी बोलीभाषेच्या लेखनसमृद्धीसाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमात धुळे शहरातील मोजक्या शाळांना सहभागी करून विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे.
प्रा.सदाशिव सूर्यवंशी,
आयोजन प्रमुख, अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन.
केंद्रीय अध्यक्ष, खानदेश साहित्य संघ