
पोलीस पाटील संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात पो.नि. शिंदे यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील काळभैरवनाथ मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे पोलीस पाटील दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पो. नि. विजय शिंदे, मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक चौधरी, जिल्हा सचिव हर्षल पाटील, जिल्हा संघटक रमेश पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष गोविंद शिंदे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, डॉ. विलास पाटील आदी उपस्थित होते. पो. नि. शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गुन्हेगारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, यासाठी गावातील घडणाऱ्या चुकीच्या घटनांना वेळीच अटकाव करणे हे पोलीस पाटलांचे आद्य कर्तव्य आहे. आज प्रत्येक गावात तरुण मुले सहज उपलब्ध म्हणून दारुच्या आहारी गेले आहेत, त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटलाने गावातील गुन्हेगारीचा कचरा साफ करायला हवा. अमळनेर तालुका पू. सानेगुरुजी, संत सखाराम महाराज यांसारख्या महान व्यक्तिंच्या विचारांनी ओळखला जातो. त्यामुळे आपण आपले कर्तव्य बजावून या महान व्यक्तिंच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. गावात राहून राजकारणाची खेळी करू नका, चुकीच्या गोष्टी जागेवरच ठेचून काढा, असेही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना केले. यावेळी मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक पोलीस पाटलांनी कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, कायद्याचा अभ्यास असल्यास आपणास कर्तव्य बजावताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. यावेळी कार्यक्रमात मारवड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मोरे यांनी तर आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले.







