आजचा महाराष्ट्र हा कालच्या महाराष्ट्रापेक्षा बराच वेगळा दिसतो,शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक, क्षेत्रात झालेली प्रगती,विज्ञान तंत्रज्ञानाने विकसित उद्योगात आधुनिकीकरण अशा विविध बाबीमुळे देशात महाराष्ट्राचे स्थान अनेक बाबीत इतर राज्यांपेक्षा बलाढ्य होत आहे, विविध क्षेत्रात महाराष्ट्राची वाटचाल ही अधिक वेगाने विकसित होत असल्याने भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कसा असेल याचं आपण जिवंत उदाहरण म्हणून मुंबई,पुणे, नागपूर, औंरगाबाद अशा ठिकाणी होत असलेल्या विकासावरून लक्षात येईल,असो पण क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्राची वाटचाल ही तळागळातील क्रीडा सक्षमीकरणाकडे होत असल्याची चित्र दिसत आहे, याच उत्तम उदाहरण म्हणून दिल्ली,पुणे,आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेवरून घ्यावं लागेल,नुकत्याच गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवरून बऱ्याच बाबी लक्षात येतात, बालेवाडी(पुणे) येथे तयार होणारे क्रीडा विद्यापीठ अशी क्रीडा वाटचाल विविध खेळांच्या विकासासाठी पोषक ठरत आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घराघरात कुस्ती खेळाने एक वेगळं स्थान निर्माण केलं, खरंतर “खेळ तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्या खेळावर प्रेम करणारी मंडळी पुढे येतात.” कुस्ती प्रमाणेचं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून उत्कृष्ट असे बॉक्सर पुढे येत असल्याने महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचे आजचं समीकरण हे येणाऱ्या काळासाठी अधिक फायदेशीर ठरेल,कधीकाळी मुंबई- पुणे,नागपूर पर्यंत मर्यादित असलेला बॉक्सिंग खेळ आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहचत तेथून विजेता घडविण्यापर्यंत जे बॉक्सिंग जाळे संपुर्ण महाराष्ट्रात विणले गेले ते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव जय कवळी यांच्या मार्गदर्शनाखाली,जय कवळी यांनी बॉक्सिंग खेळाविषयी ठेवलेली दूरदृष्टी,मिशन ऑलिम्पिकचे ध्येय, गावागावात,खेड्या पाड्यात बॉक्सिंग खेळाचा जयघोष व्हावा यासाठी जास्तीत-जास्त बॉक्सिंग सारथी व्हावे याकरिता संघटन शक्तीचे सामर्थ्य हेचं बॉक्सिंग खेळाचे विजेते महाराष्ट्रात तयार करू शकतील ही दूरदृष्टी जय कवळी यांनी ठेवली आणि त्यामुळेचं महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचं समीकरण अधिक मजबूत होताना दिसत आहे, बॉक्सिंग खेळासाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण होत २०२४ व २०२८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व नक्कीच करतील असं वाटतं आणि खरचं असं झालं तर यात महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, महाराष्ट्राच्या सर्व,जिल्हा संघटना,बॉक्सिंग प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे व बॉक्सिंग ह्या खेळाचा प्रचार व प्रसारासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या बॉक्सिंग कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा असेल यात शंका नाही,खरंतर जय कवळी यांनी बॉक्सिंग खेळाविषयी माझ्या धुळे जिल्ह्याचा तयार केलेला नकाशा मला नेहमीच प्रेरणादायी ठरतो आणि त्यावरूनचं धुळे जिल्ह्यातील गावागावापर्यंत बॉक्सिंग खेळ कसा पोहचेल हे समीकरण लक्षात येत जातं आणि बॉक्सिंग खेळाचे जाळे विणले जाते, खरचं तो नकाशा बघूनचं महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचे ध्येय स्पष्ट होतं, जय कवळी हे प्रत्येक वाक्यात काल,आज आणि उद्या” हे वाक्य नमूद करतात की ध्येयवादी मानसिकता ठेवून हा खेळ महाराष्ट्रात कसा उंच शिखरावर पोहचेल याची कल्पना येते.
आजही शहरी व ग्रामीण भागात बॉक्सिंग खेळ म्हटलं तर पालकांच्या अंगावर काटे उभे राहतात याचा अनुभव मी स्वतः घेतला,शहरात वावरत असतांना किंवा मैदानावर मला बरेच पालक भेटतात आणि सांगतात की माझ्या मुलाला मैदानावर पाठवायचे आहे,मग मी सहज त्या पालकांना सांगतो की तुमच्या मुलाला मग बॉक्सिंग खेळात टाका असं सांगितल्या-सांगितल्या बऱ्याच पालकांचे हास्य हरवतं कारण त्यांना असं वाटतं की मारा-मारीच्या खेळात मी माझ्या मुलाला टाकायचं यामुळे बरेच पालक नकारार्थी उत्तर देतात, खरं तर मुलांची शारीरिक क्षमता व कारक कौशल्य पाहूनचं पालकांना सल्ला देणं योग्य ठरतं पण मी एक संशोधनाचा भाग म्हणून मी अनेक पालकांना बॉक्सिंग विषयी नेहमी प्रश्न विचारत असतो भरपूर वेळेस सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूंनी मला उत्तरं मिळतात पण ह्या दोन्ही बाजूंनी मिळालेली उत्तरे माझ्यासाठी किती समाधानी ठरतात याचा मी कायमचं शोध/अभ्यास करत असतो,म्हणून माझं “पालक-प्रशिक्षक-खेळाडू” हे समीकरण लक्षात येत त्याची व्याप्ती समजते,निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि त्यावरुन बॉक्सिंग विकासाची पंचसूत्री आराखडा तयार होत अंमलबजावणी करणे सोपे होते, खरंतर आज नंदूरबार,धुळे,चंद्रपूर, गडचिरोली,वर्धा, बुलढाणा,परभणी,नांदेड सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून बॉक्सिंग खेळाडू पुढे येत शालेय व संघटनेच्या राज्य,राष्ट्रीय स्पर्धेचे पदक विजेते खेळाडू महाराष्ट्राला मिळत आहे,त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू अनंता चोपडे कडे पाहता येईल.महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचा मला नेहमीचं अभिमान वाटतो कारण संघटनेच्या उत्तम कार्यशैलीमुळेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग खेळ पोहचू शकला,सतत विविध उपक्रम क्रियाशीलपणे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना राबवत असल्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात बॉक्सिंग खेळ एक उंची गाठत असल्याने “महाराष्ट्रात बॉक्सिंग खेळाचं समीकरण.” हे बलदंड होत जाईल आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंग पदक विजेत्या खेळाडूंचा आलेख हा उंचावत जाईल.
:- भरत कोळी
(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक,धुळे)