
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले आंदोलन मागे…

अमळनेर:- विविध मागण्यांसाठी सात्री ग्रामस्थांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगिती देण्यात आली आहे. मात्र मागण्यांबाबत तात्काळ पाऊले न उचलल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला.

वेळोवेळी निवेदन देवून ही समस्या सुटत नसल्याने तसेच दरवेळी आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याने सात्री ग्रामस्थ व्यथित झाले होते व प्रजासत्ताकदिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या जलसाठ्यात ग्रामस्थांसह जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला होता. काल २६ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामस्थ पाडळसरे जात असताना पोलिसांनी त्यांना गोवर्धन येथे अडविले असता त्याठिकाणी ग्रामस्थांनी रस्ता रोको व ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी निम्न तापी प्रकल्पाचे कार्य. अभियंता मुकुंदा चौधरी, उपकार्य. अभियंता व्ही एस पाटील यांसह अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समजूत काढली. तसेच प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी एन. आय. कटारे, तलाठी वाल्मिक पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. सदर आश्वासनात नमूद केले आहे की, गावास बारमाही रस्ता पाटचारी मार्गाने रस्त्याची मागणी केली आहे. परंतु काही ग्रामस्थांनी सदर पाटचारी मार्गाने होणा-या रस्त्यास विरोध दर्शविला आहे. त्या अनुषंगाने ग्रामसभेत चर्चा व एकमताने ठराव करून पर्यायी रस्त्याचे मार्ग निश्चिती करावी, व कळवावे. गृह संपादन प्रस्ताव गावठाण कामाच्या अधिसुचनेस जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मान्यता देण्यात आली असुन कामकाज सुरू आहे. दोन्ही मयतांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनास प्रस्ताव सादर केला असून मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. मागण्यांची पुर्तता करणे तसेच गावातील समस्यांचे निराकरण करण्याबाबत सर्व कार्यवाही शिघ्रगतीने सुरू असल्याने आपण कोणत्याही प्रकारची जल समाधी करू नये अशी विनंती या लेखी आश्वासनांत करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार यांनी नगरपालिका प्रशासनाला पत्र देत पालिकेत असलेली बोट व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी असलेले साहित्य सात्री ग्रापंच्या ताब्यात द्यावे असे नमूद केले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची विनंती मान्य करत आंदोलन मागे घेतले मात्र पुन्हा आश्वासन देवून कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा ही दिला. यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, सरपंच सखुबाई भील, सचिन बोरसे, मनोहर बोरसे, भीला पाटील, सुमनबाई भील, सुनील बोरसे, भटा बाई भील, सुनंदा भील, बेबाबाई भील, निर्मलाबाई पाटील, चंद्रकलाबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाणे, पीएसआय बाळकृष्ण शिंदे, हवालदार भरत ईशी, फिरोज बागवान, सुनील तेली, संजय पाटील, रेखा परदेशी, सुनील अगोणे यासह मारवड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिक्रिया….
आंदोलनाची दखल घेवून शासनाने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले असून मात्र प्रलंबित प्रश्न न सुटल्यास १ मे नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता जलसमाधी आंदोलन करण्यात येईल तसेच पावसाळ्यापर्यंत पर्यायी रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास ग्रामस्थ अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात राहायला येतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.
:- महेंद्र बोरसे, माजी सरपंच, सात्री
सदस्य, जिल्हा पुनर्वसन समिती जळगाव







