
परिसरातील भाविकांनी घेतला लाभ, विविध मान्यवरांनी ही लावली उपस्थिती…

अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे श्री शिव महापुराण कथा सेवा समिती व ग्रामस्थांतर्फे आयोजित श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाचा दिनांक २६ रोजी समारोप झाला. यावेळी परिसरातून असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली होती.

मारवड येथील श्री विठ्ठल मंदिर चौकात १९ जानेवारी पासून श्री शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ ते ११ शिवकथा श्रवण करण्यासाठी मारवड, गोवर्धन, बोरगाव सह परिसरातील खेड्यातून भाविक विशेषत महिलांची उपस्थिती लाभली. श्रीकृष्ण कृपामुर्ती भागवताचार्य श्री हभप वामनजी महाराज (लामकानी) यांच्या अमृत वाणीतून सर्व भाविक भक्तांनी शिवकथा श्रवणाचा लाभ घेतला.

हभप वामनजी महाराज यांनी शिवकथा कथन करताना वेशभूषा करत सजीव देखावे सादर करत युवकांनी अध्यात्माकडे वळावे, आई वडिलांना सांभाळावे असा उपदेश केला. दिनांक २६ गुरुवार रोजी सकाळी काल्याचे कीर्तन पार पडून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी ही २५ जानेवारी रोजी रात्री श्री शिवकथेच्या कार्यक्रमास हजेरी लावत पूजा करून आशीर्वाद घेतले. सदर कार्यक्रमास हभप दिनेश महाराज लोंढरे, चंद्रकांत महाराज शिरसोली, पवन महाराज जळगाव, शुभराज महाराज करणखेडा यांचे संगीतमय संयोजन लाभले तसेच लावण्या टेन्ट व डेकोरेटर्स व माऊली साउंड सर्व्हिस यांनी व्यवस्था सांभाळली. यावेळी ग्रामस्थ व युवकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभत सात दिवस हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.







