कृषी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाला शेतकऱ्यांची उपस्थिती…
अमळनेर:- तालुक्यातील सडावन येथे कृषी विभागातर्फे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
तालुका कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व प्रधानमंत्री सुषमा खाद्य अन्नप्रक्रिया योजना प्रचार प्रसिद्धी व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगून तृणधान्याचे लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ करणे तसेच बाजार भाव व पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्नप्रक्रिया योजनेची संसाधन व्यक्ती प्रवीण पाटील यांनी योजना सविस्तरपणे समजून सांगितली तसेच त्यामध्ये कोणते उद्योग येतात तसेच त्याला मिळणारे अनुदान याविषयी सांगितले शेतकऱ्यांना फॉर्म वाटप करून लागणारे कागदपत्र कोणते असतील, याची माहिती दिली व जास्तीत जास्त अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक आर एच पवार यांनी केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी कचरे, कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार उपस्थित होते. या कार्यक्रमाला सडावन खुर्द, कन्हेरे, रडावन, हेडावे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गुलाब पाटील, रावसाहेब पाटील, मच्छिंद्र पाटील, रमाकांत पाटील, ऋषिकेश पाटील, जिजाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अमोल पाटील व श्रीकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. बचत गटाच्या सदस्या व महिला शेतकरी उपस्थित होत्या. कृषी सहाय्यक राजेश बोरसे यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी वर्ग तसेच परिसरातील नागरिक यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.