
पातोंडा येथील दोन महिलांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू….
अमळनेर:- सिहोर येथील रुद्राक्ष महोत्सवातून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाल्याने पातोंडा येथील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील सिहोर येथे आयोजित शिवपुराण कथा आणि रुद्राक्ष महोत्सवासाठी खान्देशासह देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक पोहचले होते. तेथून पतरणाऱ्या भाविकांची इको गाडी क्रं. एमएच १९ डीव्ही ६७८३ हीचा मध्यप्रदेशातील जुलवानिया या गावाजवळ भीषण अपघात झाल्याने पातोंडा येथील शोभाबाई लुकडू पाटील (वय५२) व कमलबाई आत्माराम पाटील (वय ५५) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच इतर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवत उपचार सुरू करण्यात आले आहे. सदर महिला एकमेकांच्या देवरानी जेठानी असल्याची माहिती मिळाली असून पातोंडा परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान सिहोर् येथे रुद्राक्ष घेण्यासाठी पोहोचलेल्या अनियंत्रित गर्दीमुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून वेगवेगळ्या भागातून महिला बेपत्ता झाल्याचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल होत असून याबाबतच्या कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल होत आहेत. दरम्यान जीव धोक्यात घालून अनियंत्रित गर्दीच्या ठिकाणी जाणे हे श्रद्धेचे लक्षण नसून आपल्या कुटुंबियांना चिंतेत टाकण्याचे काम असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.







