अमळनेर येथील डेफोडील सोनवणे हीचा प्रत्यक्ष सहभाग…
अमळनेर:- डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत उपग्रह तयार करून तामिळनाडू येथील पट्टीपुलम येथून रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या चमूत अमळनेर येथील डेफोडील जगदीश सोनवणे हीचा सहभाग होता.
अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपतर्फे देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या ५००० विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितावर काम करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांचे पर्यवेक्षण करणे आणि 150 उपग्रहाच्या डिझाइन आणि विकासासाठी त्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. यात परीक्षेद्वारे निवड होवून अमळनेर येथील एकमेव विद्यार्थिनीची निवड झाली होती. त्यानंतर त्यांना उपग्रह बनविण्याचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्याकडून १५० पिको उपग्रह तयार करण्यात आले. १९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडू येथील पट्टीपुलम येथून यशस्वीरित्या भारतातील पहिले हायब्रीड रॉकेट लाँच झाले. त्यासोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह अवकाशात यशस्वीपणे नेण्यात आले. हे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी वापरलेले रॉकेट सुद्धा भारतीय बनावटीचे होते. या मिशनचे वैशिष्ट्य असे कि संपूर्णपणे भारतीय विद्यार्थ्यांची हि मिशन होती. संपूर्ण जगात अशी स्टुडंट्स मिशन आजवर झालेली नसल्याने अर्थातच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये या मिशनची नोंद झाली. अतिशय रोमांचित असलेल्या या मोहिमेत अमळनेर येथील ग्लोबल स्कुलची विद्यार्थीनी डेफोडील सोनवणे ने प्रत्यक्ष सहभाग घेतला. रॉकेट प्रक्षेपणावेळी तिच्या सोबत तिचे वडील जगदीश सोनवणे व आई भाग्यश्री सोनवणे ह्या ही पट्टीपुलम येथे उपस्थित होत्या. अवकाश संशोधनसंबधी चालना देणारी हि मोहीम डॉ आनंद मॉलिगंम या २९ वर्षे वयाचे तरुण वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनात पार पडली. डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेईकल मिशन २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी ५००० उमेदवारांमधून महाराष्ट्रातून ५३० विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभाग होता. यावेळी डेफोडील हिला मिलिंद चौधरी, मनिषा चौधरी, प्राचार्य एल. लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभले.