बाळ ही दगावले, पाडळसरे गावावर पसरली शोककळा…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील हात मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गर्भवती जागृती अनिल कोळी (वय २२) यांना प्रसवकळा सुरू होताच दिनांक २७ रोजी दुपारी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून डॉक्टरांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्यावर काल दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजता जागृतीची प्रसूती करण्यात आली मात्र जन्माला आलेले बाळ दगावले व जागृतीला प्रसूती नंतर रक्तस्राव सुरू झाल्याने तिला धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिचा ही मृत्यू झाला. जन्माला आलेले बाळ व जागृतीच्या मृत्यूची वार्ता माहीत झाल्यानंतर गावात एकच शोककळा पसरली.
स्वतः मजुरी करत इतरांना ही रोजगार उपलब्ध करून सामूहिक गटाने संचालन करणारा अनिल तुकाराम कोळी व त्याचा दिमतीला हात मजुरी करून हातभार लावणारी जागृती ही काल पर्यंत तिने कष्ट घेत सुखी संसार करणारे दाम्पत्य म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख गावात निर्माण केली होती. अल्पशा आजाराने आईवडील गमावलेल्या अनिल कोळीच्या संसार थाटण्यासाठी बांभोरी ता धरणगाव येथील माहेर असलेल्या जागृतीने अनिल कोळी यांच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह करून मजुरीवर तीन दुभत्या गायी घेऊन दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून घरी आल्यावर गायींना चारा आणून दुधाचा जोड व्यवसाय सुरू केला होता. दोनच वर्षात संसार फुलवून वेल बहरत असतानाच बाळाचा जन्म होताच बाळ दगावले व जागृतीचाही अति रक्तस्राव होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गाव हळहळले. गावात एकाही घरात चूल पेटली नाही. मृत जागृतीचे दिनांक १ मार्च रोजी धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह ताब्यात मिळाल्यावर गावी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत जागृतीच्या पश्चात पती, चुलत सासरे व दोन नणंद असा परिवार आहे.