अमळनेर:- तालुक्यातील २० टक्के कर्मचारी वगळता सर्वच विभागातील ८० टक्के कर्मचारी संपावर उतरल्याने कामकाज ठप्प झाले होते.
जुनी पेन्शन लागू असलेले मोजके शिक्षक ,पदोन्नतीवर असलेले काही कर्मचारी आणि अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालयात उपस्थित राहावे लागणार यासाठी फक्त २० टक्के कर्मचारी कामावर हजर होते. बारावी परीक्षा कामकाजावर असलेले कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार संपावर असताना फक्त परीक्षा घेण्यासाठी हजर होते. त्याव्यतिरिक्त मुख्याध्यापक, शिक्षक, कारकून, शिपाई, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, तलाठी, महसूल कर्मचारी, नगरपालिका सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, अभियंते, कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी आदी विविध विभागातील कर्मचारी संपावर उतरले आहेत. शाळा ओस पडल्या होत्या. कार्यालयात शुकशुकाट होता. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत होते. नगरपालिका सफाई कर्मचारी संपावर असल्याने स्वच्छता बारगळली होती. अनेक नागरिकांना हेलपाट्या माराव्या लागल्याने मानसिक त्रास झाला. तहसील कचेरी बाहेर विविध संघटनांनी निदर्शने व घोषणाबाजी केली. प्रताप महाविद्यालयच्या मैदानावर देखील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली तर नगरपालिका कर्मचाऱ्यांनाही निदर्शने केली. ज्या शाळांमधील कर्मचारी संपावर उतरले नव्हते त्यांनी लहान बंधू संपावर आणि आम्ही सफाई मोहिमेवर म्हणून शाळांची साफसफाई केली. संप सुरूच ठेवून दररोज तहसील कचेरीबाहेर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.