माजी आ.स्मिता वाघ व शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढविणार…
अमळनेर:- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आ स्मिताताई वाघ व माजी आ शिरीष चौधरी यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित मोट बांधण्याचा निर्णय घेतला असून जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राम नवमीच्या मुहूर्तावर एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सदर निर्णयामुळे आता अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पॅनल रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचे नेते तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली व माजी आ डॉ बी एस पाटील यांच्या आशीर्वादाने या दोन्ही माजी आमदारांनी एकत्र येऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नव्हे तर निवडणुक सोबत लढण्याचा निर्णय झाल्याने बाजार समितीवर भाजपाचा झेंडा पुनःच्छ फडकणार असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही स्थानिक नेत्यांचे झालेले हे मनोमिलन इच्छुक उमेदवारांचे मनोधैर्य आणि ताकद वाढविणारे ठरणार असून यानिमित्ताने भाजपचे तगडे आव्हान विरोधकांसमोर उभे राहणार हे स्पष्ट झाले आहे.
नवीन राजकीय समीकरणांची नांदी…
विजनवासात गेलेले माजी आमदार साहेबराव पाटील हे परतल्याने महाविकास आघाडीने त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आमदार अनिल पाटील आणि मा. आ. साहेबराव पाटील यांच्या एकत्र आल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली होती. त्यांना टक्कर देण्यासाठी व दूध संघाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हे दोन्ही माजी आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आता तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत.