आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत विद्यार्थिनींची बँकेस भेट…
अमळनेर:- क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व कै. न्हानभाऊ मंसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत विद्यार्थिनींनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मारवड शाखेला भेट देऊन बँकेच्या विविध कार्यप्रणाली, डिजिटल व्यवहार, तसेच फ्रॉड कॉलच्या माध्यमातून होणारे नुकसान याबाबत शाखा व्यवस्थापक भूषण सोनवणे व सहाय्यक दीपक चौधरी यांनी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.
मारवड सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक भूषण सोनवणे सर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, बँक व्यवहारांबाबत जसे डीजिटलायझेशन बाबतीत विशेष जनजागृती नसल्याने बँक ग्राहकांसोबत विविध फसवणुकीचे प्रकार सर्रास घडून ग्राहकाचे प्रसंगी मोठे आर्थिक नुकसान होत असते. दिवसेंदिवस बँक व्यवहारांची कॅशलेस प्रणाली विकसित होत असताना बँक ग्राहकांनीही समयानुरूप अपडेट असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, बँक कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाच्या अकाउंटची डिटेल्स दूरध्वनीवरून विचारत नसून याबाबत येणारा कॉल हा फ्रॉड कॉल समजून त्यासोबत अधिक भाष्य टाळावे आणि आपल्या खात्यासंबंधी कुठलीही माहिती जसे ओटीपी ,एटीएम नंबर ,सी व्ही व्ही पिन व इतर कुठलीही माहिती न देता त्याबाबत आपल्या जवळील शाखेची संपर्क साधून आपल्या बँक अधिकाऱ्यांना तशी माहिती तात्काळ दिल्यास ग्राहकाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सेंट्रल बँकेचे शाखा सहाय्यक दीपक चौधरी यांनी कॅश काउंटरवर चालणारे दैनंदिन व्यवहार, वेगवेगळे डिजिटल ॲप व त्यांचे फायदे, विविध कृषी विषयक शेतकरी हिताच्या योजना, ट्रॅक्टरसाठी कर्ज, शेती औजार वितरनासाठी शासनाची योजना तसेच झिरो बॅलन्सवर खाते उघडणे, शासन विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध विद्यार्थी हिताच्या योजना जसे शैक्षणिक कर्ज , सेविंग अकाउंट, दाम दुप्पट योजना, बचत योजना ,मिनिमम बॅलन्स, एटीएम कार्डचा योग्य वापर इत्यादींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रथमता महाविद्यालयाच्या वतीने शाखा व्यवस्थापक भूषण सोनवणे यांचा सत्कार महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय पाटील यांनी केला.सहाय्यक दीपक चौधरी यांचा सत्कार प्रा. किशोर पाटील यांनी व कॅशियर अर्चना पाटील मॅडम यांचा सत्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. नंदा कंधारे यांनी केला. शाखेचे सहाय्यक चेतन धनगर यांचा सत्कार प्रताप भिल यांनी केला. यशस्वीतेसाठी मारवड सेंट्रल बँक शाखेचे सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. मारवड शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. नंदा कंधारे यांनी आभार व्यक्त केले .