
अमळनेर:- ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या पिंपळकोठे येथील जिल्हा परिषद शाळेस विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून गावातील दात्यांनी विद्यार्थ्यांसाठी संगणक, दप्तर, वह्या व लेखन साहित्य भेट दिले.

पिंपळकोठा ता. पारोळा येथील प्रतिष्ठित नागरिक विलास भीमराव पाटील यांनी त्यांच्या आई कै. सुंदरबाई भिमराव पाटील याच्या स्मरणार्थ शाळेला संगणक संच भेट दिला. गावचे पोलीस पाटील तापीराम पाटील यांनी शाळेला पीएच.डी. झालेले व उच्च शिक्षित शिक्षक लाभले हे आमच्या गावाचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार काढले. शाळेच्या प्रगतीचा उंचावणाऱ्या आलेखाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .याप्रसंगी गावातील तरुण व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना लागणारे दप्तर रामकृष्ण भैय्यासाहेब पाटील, वह्या संभाजी जगतराव पाटील, लेखन साहित्य दिलीप निंबा पाटील यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भोलाणे येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग कौतिक पाटील यांनी शाळेला पाचशे रुपये बक्षीस दिले. या आधीही राकेश गोरख पाटील, दत्तू पाटील, मनीष बच्छाव (पीएसआय मुंबई), अक्षय शिवाजी पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पिंपळकोठे शाळेत डॉ.प्रदीप भदाणे यांच्या कल्पनेतून स्वखर्चाने साकारलेल्या “गणित प्रयोगशाळा” या प्रकल्पाची निवड राज्यातील चार शाळांमध्ये झाली होती. गणित प्रयोग शाळेतील कृतींचे व्हिडिओ चित्रीकरण नुकतेच पार पडले असून व्हिडिओ डॉक्युमेंटरी निपा (नॅशनल इन्स्टिट्यूट एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली) संस्थेच्या राष्ट्रीय पोर्टलवर थोड्याच दिवसात प्रकाशित होणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम शाळेत राबवले जातात. शिक्षकांची मेहनत व ग्रामस्थांचे सहकार्य यातून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावला जाऊ शकतो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. याप्रसंगी भीमराव यादवराव पाटील, भाईदास पा. भटू पा. चंद्रकांत पा. प्रदीप पा. प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पा., दीपक पा. भगवान पा. चेतन पा. राहुल पा. आशुतोष पा. विश्वास पा. सुरेश पा. व इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप भदाणे यांनी केले मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी आभार व्यक्त केले. पी. आर. विसावे, संदीप सोनवणे, श्रीमती संगीता सोनवणे यांचे सहकार्य लाभले.







