प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिला होणार सन्मानित…
अमळनेर:- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत अथवा गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दरवर्षी ३१ मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ (नारळ), रोख रक्कम (रु. ५००/- प्रती महिला) असे पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. ज्या ग्राम पंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल/ ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल, अशा ठिकाणी प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. जेणेकरून आलेल्या अर्जामधून पुरस्कार निवड करण्यात येईल. तरी विविध गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक बंधूंनी महिला सन्मानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना जळगावचे डी ए धनगर यांनी केले आहे
पात्रता निकष….
-महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट, उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला
-सदर महिला हया त्याच ग्रामपंचायतीतील/गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी.
– त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे,
-महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ३ वर्ष कार्य केलेले असावे,
-पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील,
-महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी. सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा,
-महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी.
-बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.
महिला सन्मानासाठी सरकारचे पाऊल….
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा सन्मानासाठी राज्य सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक गावातील कर्तबगार दोन महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे, महाराष्ट्र शासनाचे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीने अभिनंदन! यानिमित्ताने महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच त्यांना कार्यप्रणव ठेवण्याची ऊर्जा बनवणार आहे. म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी! महिला सक्षमीकरणासाठी खूपच चांगला निर्णय आहे.
–डी ए धनगर (अमळनेर)
माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना, जळगांव