शेतमालाला भाव नसल्याने खा. शरद पवारांनी केली केंद्र सरकारवर टीका…
अमळनेर:- काल अमळनेर शहरात ग्रंथालय सेलच्या कार्यक्रमाला आलेल्या खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली.
राष्ट्रवादी ग्रंथालय शिबीराचे पहिले सत्र आटोपल्यावर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. ईव्हीएम मशीन बाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, आमचे सहकारी दिग्विजयसिंग यांनी ईव्हीएम द्वारे निकाल बदलले जाऊ शकतात असे सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच निवडणुकीची जुनी पद्धत असावी ईव्हीएम पद्धत बंद करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मुद्द्यावर काही राज्यांमध्ये सत्तेत बदल झाला त्यामुळे आगामी निवडणुकात महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर हा विषय असेल का या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपच्या विरोधातील देशभरातील सर्व पक्ष समान कार्यक्रमावर एकत्र येऊन लढणार आहोत. आणि समान कार्यक्रम ठरविण्याच्या वेळी आमच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्यावर आपले मत व्यक्त करताना पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्ष आणि देशपातळीवरील त्यांची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. समान नागरी कायद्याचा प्रस्ताव अद्याप सभागृहात चर्चेला आला नाही. त्यात काय मुद्दे असतील हे जेव्हा समोर येईल तेव्हा त्यावर योग्य चर्चा करता येईल. कर्नाटकात काँग्रेसकडून शालेय अभ्यासक्रमातून हेडगेवारांचा धडा वगळण्यात आला. त्यावर भाजप टीका करत आहे यावर तुमचे मत काय असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, लहान मुलांचे वय हे संस्कारक्षम वय असते. आणि त्यांच्या मनावर योग्य परिणाम होतील अशा प्रकारचे लिखाण अभ्यासात असले पाहिजे. कर्नाटकात निवडणुकीपूर्वी हा विषय जाहीरनाम्यात दिला होता. ज्याला मान्यता आहे तो कार्यक्रम राबवला पाहिजे आणि जनतेने कर्नाटकात काँग्रेसला स्वीकारले आहे म्हणजे जनतेला ते मान्य आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकरी मालाला कपाशीला भाव नाही यावर देखील शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा सरकारने केली मात्र सरकार कमी भाव देत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही त्यामुळे शासनाने शासनाच्या एजन्सी मार्फत माल खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना अनुदान तरी द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
पत्रकार परिषदेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील हजर होते. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.