साने गुरुजी शाळेतील गणित शिक्षक डी ए धनगर यांचा उपक्रम…
अमळनेर:- येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड नाहीसा करून नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी गणित शिक्षक डी ए धनगर यांनी गटचर्चा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या मित्रांकडूनच गणित विषयाचे शंका समाधान करून घेतले. हा आनंददायी उपक्रम विद्यार्थ्यांना खूपच आवडला.
गणित विषय म्हटला म्हणजे भल्या भल्यांना धडकी भरते. त्याला विद्यार्थी अपवाद कसे असू शकतील? बहुतांश विद्यार्थी गणिताविषयी असलेल्या शंका शिक्षकांना विचारायला घाबरतात. त्यामुळे गणितात योग्य ती प्रगती साधली जात नाही. त्यावर उपाय म्हणून गणित शिक्षक डी ए धनगर यांनी गणितात अधिक प्रगती असलेले वर्गातील मुले शोधून काढली. काही विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना, घटक एकदाच सांगून समजते तर तीच संकल्पना,घटक काहींना उशिरा समजते. त्यामुळे गणित विषयात अधिक प्रगत असलेले विद्यार्थी जिज्ञेश पाटील, यशमित खैरनार, मनिष बारी, सार्थक चौधरी, गुरुराज कागणे, हर्षल पाटील,आरुष बाविस्कर, गितेश मोरे, सोहम सोनवणे,पराग कापडणीस, हर्षवर्धन पाटील, धीरज पाटील, ॠषीकेश पाटील, गौरव धनगर, आयुष सोनवणे यांची पॅरेंट लीडर म्हणून निवड केली. या प्रत्येकाला आपल्या सोबत इतर चार विद्यार्थी निवडण्याची संधी देण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मुलांनी आपल्या सह अध्यायी मुलांकडूनच शिकले पाहिजे हे अभिप्रेत आहे. त्याला अनुसरून पद्धतीने प्रत्येक गटात पाच विद्यार्थी झाले. प्रत्येक पॅरेंट लीडरने गटात आपल्यापेक्षा गणितात कमी प्रगती असलेले सह अध्यायी शोधले. त्यानंतर गणिताच्या तासिकेला पटांगणात गटातील विद्यार्थ्यांना न समजलेल्या भागावर एकमेकांना शंका विचारू शंका समाधान करून घेतले. जो भाग संकल्पना ज्याला चांगला समजलेला होता त्यांनी इतरांना सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न केला व आपल्या ज्ञानाचे दृढीकरण करून घेतले व मित्रांना आपल्याला अवगत ज्ञानाचा फायदा करून दिला. त्याचबरोबर सांघिक भावना निर्माण होऊन नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत झाली. विशेष म्हणजे विद्यार्थीच विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने प्रश्न विचारू लागले. गणिताविषयी मनात असलेला न्यूनगंड झुगारून शंका समाधान करून घेऊ लागले. त्यामुळे गणिताविषयी असलेली अनामिक भीती जाऊन आनंददायी शिक्षणाची अनुभूती घेत आपले ज्ञान अद्यावत करून घेतले. या उपक्रमामुळे येणाऱ्या परीक्षेत उत्तम गुणवत्ता वाढ व नेतृत्व गुण वाढीस मदत होईल असे मत मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी व्यक्त केले. सदर उपक्रमाचे संस्थापक गुलाबराव पाटील, संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, शालेय समिती अध्यक्ष गुणवंतराव पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुनील पाटील व पालक आदींनी कौतुक केले.