श्वास कोंडला जाऊन १३ गुरांचा मृत्यू, अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- विना परवाना ३३ गुरांना पाय बांधून ट्रक मध्ये कोंबून घेऊन जाणाऱ्या मध्यप्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली असून ट्रक व १ लाख १३ हजार रुपयांची गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, संजय बोरसे, चंपालाल पाटील याना परिमंडळ गस्त लावली होती. ११ रोजी पहाटे पोलीस १ वाजता सावखेडा गावाजवळ पोलिसांना गस्त घालताना ट्रक क्रमांक आर जे ०९ जी डी ५८७६ उभी होती व चालकाला काही लोक मारत असल्याचे आढळून आल्याने अपघात झाला असावा म्हणून पोलिसांनी गाडी थांबवली. त्यावेळी मारहाण करणारे अचानक पळू लागले. पोलिसांनी ट्रक पाहिला असता ट्रक मध्ये गुरे कोंबून भरली होती व त्यांचे पाय बांधलेले होते. चालकाला नाव विचारले असता त्याने रशीद नथेखा पठाण (वय ३५ रा शेखा चौक मंदसौर मध्यप्रदेश) असे सांगितले तर त्याच्यासोबत असणाऱ्यांनी दयाल देविदास बैरागी (वय ३८ रा इंदिरा कॉलनी मंदसौर मध्यप्रदेश) व मोहमद सद्दाम मोहम्मद बजारोद्दीन (वय २६ रा पक्की बाग कॉलनी इटावा) असे नाव सांगितले व गुरे वाहतुकीचा परवाना नव्हता. चोपड्यातून काही लोकांनी त्यांचा पाठलाग करून मारहाण सुरू केली होती. कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून लागलीच अमळनेर पोलीस स्टेशनहून पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, योगेश सोनवणे यांना बोलावण्यात आले. पंचनामा करून ट्रक व गुरे अमळनेर येथे आणण्यात आली. गुरांची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी करायला सांगितले असता गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन १३ गुरांचा मृत्यू झाला होता. सुमारे १ लाख १३ हजार रुपये गुरांची किंमत होती. पोलिसांनी ट्रक जमा करून आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ च्या कलम ५, ५(ब),९ ११ तसेच प्राण्यांना क्रूर वागणूक प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ३ ,११ भादवि कलम ४२९ मोटार वाहन कायदा ८३,१७७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.