चौकशी होईपर्यंत बाजार समितीने केला परवाना निलंबित…
अमळनेर:- रेशनचे गहू तांदूळ घेणाऱ्या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांचा परवाना बाजार समितीने पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित केला आहे.
अमळनेर बाजार समितीत तांदळाची खरेदी विक्री होत नाही. मात्र सागर वाणी या व्यापाऱ्याने रेशनचा चार क्विंटल गहू आणि आठ क्विंटल तांदूळ खरेदी करून बाजार समितीत आणले असल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष बावणे याना मिळाल्यावरून बाजार समितीत येऊन बावणे, सचिव डॉ उन्मेष राठोड, सहसचिव अशोक वाघ , सुनील पाटील , सुनील सोनवणे, योगेश इंगळे ,गणेश पाटील यांनी पंचनामा केला. सागर वाणी याने हा माल विपीन जैन यांच्याकडून घेतल्याचे बावणे यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यात तांदळाचे उत्पादन होत नसल्याने बाजार समितीत खरेदी विक्री होत नाही म्हणून हा माल रेशनचा असल्याचा संशय आल्याने बाजार समितीने सागर वाणी यांचा व्यापारी परवाना निलंबित केला आहे. महसूल विभागातर्फे देखील चौकशी करून दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे बावणे यांनी सांगितले. दरम्यान काही लाभार्थी लोभापोटी आपला माल व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकतात आणि व्यापारी तो माल जास्त पैश्यात जनतेला विकतात. त्यामुळे कायमस्वरूपी परवाने रद्द करण्याची मागणी होत आहे.