अमळनेर:- राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचे दि.१७ ऑक्टोंबर रोजी मायाताई परमेश्वर आणि रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर धरणे आंदोलनात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत,कामाच्या मोबदल्याव्यतिरिक्त दरमहा ठराविक निश्चित मानधन लागू करण्यात यावे,आशा स्वयंसेविका १८०००/- तर गटप्रवर्तकांना २५०००/- रुपये किमान वेतन लागू करावे,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा त्यांना पेन्शन देण्यात यावी,शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मोबाईल पुरविण्यात यावेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे भाऊबीज भेट लागू करावी.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिल्या जाणाऱ्या गणवेश, मोबाईल रिचार्ज आणि सदिल खर्चाच्या रकमेत वाढ करण्यात यावी.या मागण्यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. मंत्री महोदय व्यस्त असल्याने त्यांनी आरोग्य भवनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची सुचना केली. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) डॉ.संजय सरवदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. सदर चर्चेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरमह निश्चित मानधन देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याबरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर भाऊबीज भेट देण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही सांगितले. त्याचबरोबर सीएसआर फंडातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सायकली पूरविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे चर्चेत डॉ.सरवदेंनी सांगितले.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून सेवानिवृत्त झालेवर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असेही चर्चेत सांगण्यात आले. तसेच आशाताईंना कामाचा जास्तीत जास्त मोबदला मिळण्याची तरतूद चालू पीआयपीमध्ये करण्यात आली असल्याचेही आश्वासन डॉ.सरवदेंनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत डॉ.संजय सरवदे यांच्यासह श्रीमती स्वप्नाली अहिरे(समन्वयक आशा योजना),संघटनेच्या मायाताई परमेश्वर,कल्पना भोई, कल्पना कापडणीस,अरूणा देशमुख यांनी सहभाग घेतला. चर्चा समाधानकारक झाल्याने धरणे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले असल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी सांगितले.