
पातोंडा ता.अमळनेर:- देशोधडीला लागलेली तरुणाई, वाढती व्यसनाधिनता, राष्ट्रसंत व महापुरुष यांचा इतिहास विसरून चाललेल्या तरुणाईला माँ जिजाऊंच्या संस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. गोपाल महाराज चिमठाणेकर यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने पातोंडा येथील राजमाता जिजाऊ स्मारक समितीच्या वतीने आयोजित जिजाऊ चारित्रावर आधारित किर्तनात केले.
जिजाऊ स्मारक समितीच्या वतीने जिजाऊ स्मारकाचे पूजन व माल्यार्पण करून स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामस्थांना आई जिजाऊंचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी चिमठाणे येथील ह.भ.प.गोपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनात महाराजांनी जाधव व भोसले घराण्यातील सबंध व घडलेल्या घडामोडी,जिजाऊंचा काळ, इतिहास,त्यांनी राष्ट्रहित व हिंदुत्वसाठी केलेली लढाई,त्यांची शिकवण व संस्कार असे विविध पैलू मांडून त्यांच्या शिकवणाची व संस्कारांचे आचरण करण्याची आजच्या युवापिढीला गरज असून प्रत्येकांनी आचरण करून माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनाचा आदर्श घ्यावा. कोरोनाच्या या महामारीत प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी व खबरदारी घेऊन स्व:रक्षण करून ह्या महामारीवर मात करून युवकांनी व्यसनाधितना टाळावी तरच आपण पुढचे आयुष्य नित्याने जगू शकतो. त्यासोबतच निसर्गाची होणारी मानवनिर्मित हानी टाळून जागोजागी वृक्षारोपण करून आपले गाव स्वच्छ व निरोगी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने पेलावी असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या कीर्तन मालिकेतून उपस्थित श्रोत्यांना दिला.यावेळी पातोंडा व रुंधाटी येथील भजनी मंडळ, जिजाऊ स्मारक समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व महिला यांची उपस्थिती लाभली.