
सर्वेक्षण सुरू, उष्माघात की दूषित पाणी कारण अद्याप अस्पष्ट…
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे डायरियाची लागण झाली असून अनेक रुग्णांना जुलाब चा त्रास होत आहे. उष्माघातामुळे की दूषित पाण्यामुळे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मांडळ येथे अचानक अनेकांना जुलाबचा त्रास होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खाजगी डॉक्टरांकडे सरासरी दररोज चार ते पाच रुग्ण येत आहेत. गावात एकाच वेळी अनेकांना जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने खळबळ माजली आहे.
वातावरणात अचानक उष्णता वाढल्याने दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. शेतमजूर शेतकऱ्यांना देखील त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे नेमका उष्माघाताचा त्रास होतोय की दूषित पाण्याचा त्रास होतोय याचा उलगडा झालेला नाही.
तालुका आरोग्य विभागातर्फे आशा , परिचारिका , आरोग्य सेवक यांच्या पथकातर्फे सर्वेक्षण सुरू केले असून रुग्णांची नोंद घेऊन त्याठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जात आहेत.
दररोज जुलाबाचे रुग्ण येत आहेत. डायरियाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.- डॉ सुनील चोरडिया मांडळ
मांडळ गावात तातडीने सर्वे सुरू केला असून पाण्याचे नमुने तपासणीला पाठवण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी पाणी उकळून प्यावे ,स्वच्छता ठेवावी. भरपूर पाणी प्यावे ,उन्हात जाताना डोक्यावर रुमाल बांधावा. उन्हात काम करू नये.-डॉ गिरीश गोसावी ,तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर.