संत सखाराम महाराज व महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांच्याहस्ते होईल प्राणप्रतिष्ठा…
अमळनेर:- तालुक्यातील वासरे व कळमसरे येथे श्रावण मास प्रारंभ निमित्त नर्मदेश्वर महादेवाचे मंदिरात शिवलिंग व ग्रामवासीयांचे कुलदैवत एकविरा मातेच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून वासरे येथे श्रीक्षेत्र कपिलेश्वर मठाचे महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांच्याहस्ते शिवलिंग स्थापना करण्यात येणार असून एकविरा मातेच्या मूर्तीची स्थापना अमळनेरचे संत सखाराम महाराज यांच्याहस्ते होणार आहे.
तालुक्यातील कळमसरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मोकळ्या प्रांगणात महिला भाविकांच्या स्वयंप्रेरणेने निर्माण करण्यात आलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिरात शिवलिंगचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त दिनांक १९ रोजी पहाटे पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीत कलषधारी महिला सहभागी होऊन गावभर मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ सहभागी होतील तर वासरे येथे सकाळी ६ वाजेपासून पारंपरिक वाद्य व सजविलेल्या ट्रॅक्टरवर एकविरा मातेची मूर्ती व शिवलिंग मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ६ ते ७ यावेळात हरिपाठ होऊन भारुड सादरीकरण केले जाईल तर रात्री ९ वाजता हरी जागर, देवीचा जागर गीतांचा कार्यक्रम आणि सांप्रदायिक भजन होईल. दिनांक २० रोजी कळमसरे व वासरे दोन्ही गावात एकाच वेळी सकाळी ८ वाजता नामयज्ञ, होमहवन होईल तर दिनांक २१ रोजी कळमसरे येथे नर्मदेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करून स्थापना होईल आणि वासरे येथे महामंडलेश्वर हंसानंद महाराज ,संत सखाराम महाराज, शहापूर येथील संत भगवान बाबा, हभप रुपचंद महाराज, आचार्य रामदेव महाराज, हभप गुलाबराव महाराज यांचे संत पूजन करण्यात येणार असून वरील उपस्थित सर्व संतांच्या करकमलांनी महादेवाचे मंदिरात पांच नद्यांच्या जलाने जलाभिषेक करून शिवलिंग स्थापना करून एकविरा मातेची स्थापना करण्यात आल्यावर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कळमसरे, वासरे, निम, पढावद, बेटावद, भिलाली, शहापूर, खर्दे, पाडसे, तांदळी येथील भजनी मंडळ सहकार्य लाभणार आहे.