अमळनेर:- तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.
आई वडील शेतात मजुरी कामासाठी गेले असता इयत्ता ४ थीत जाणारा चि. आकाश राजेंद्र भिल (वय १० वर्ष) हा डांगर बु. येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना त्यास सर्पदंश झाला. त्यावेळेस काकांना माहिती मिळताच त्यास जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर आकाशला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले मात्र त्याठिकाणी व्हेंटिलेटर व सर्पदंशाचे औषधे नसल्याचे कारण सांगत त्यास धुळे येथील रुग्णालयात नेण्याचे सांगितले. धुळे येथे पोहचल्यावर डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. दरम्यान आकाशचे काका यांनी “शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती तर माझा पुतण्याला मी वाचवू शकलो असतो, कारण डांगर बु. हे गाव धुळे रोडवर आहे अमळनेर किंवा धुळे येथे जाण्यासाठी अंतर व वेळ सारखाच लागतो.” अशी खंत व्यक्त केली. दरम्यान मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला.