सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 13 जागांसाठी एकूण 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून 11 जानेवारी अर्जाची छाननी होऊन 25 जानेवारी पर्यंत उमेदवारी माघार घेण्याची तारीख असून 6 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही.एम.जगताप काम पाहत आहे.
विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे गाव पातळीवर शेतकऱ्यांना शेतीसामुग्री, कृषी निविष्ठा,कृषी कर्जे मिळावीत यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सन 1936 यावर्षी या सहकारी संस्थेची स्थापना केली होती. संस्थेच्या स्थापना वर्षांपासून अनेक सभासदांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी भरीव कामगिरी करत संस्थेचे नावलौकिक मिळविले. मोठ्या संख्येने शेतकरी सभासद झालेत. पातोंडा सह शेजारील नांद्री, दापोरी गावांतील शेतकरीही ह्या संस्थेत सभासद आहेत. संस्थेची स्वतःची दुमजली इमारत दिमाखात उभी असून इमारतीच्या पहिल्या मजल्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक ऑफ बडोदा कार्यरत आहेत. तसेच संस्थेच्या वतीने दोन स्वस्त धान्य दुकाने देखील चालविले जातात. संस्थेची भरभराट सुरू असताना स्वतःला राजकीय गुरू समजणाऱ्या स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक मोहापोटी संस्थेच्या राजकारणात ढवळाढवळ करून संस्थेची भरभराट थांबविली. मागील पंचवार्षिक निवडणूकीत दोन प्रस्थापीत पॅनलच्या विरुद्ध तिसऱ्या आघाडीने प्रवेश करत विविध काल्पनिक अजेंड्याच्या मुद्यांवर निवडणूका लढविल्या. मात्र पाच वर्षांच्या कालावधीत चेअरमनपदासाठी बहुमतांनी निवडून आलेल्या पॅनलमध्ये रस्सीखेच सुरू झाल्यात.संस्थेच्या व शेतकऱ्याच्या फायद्यासाठी कुठलीही विकासात्मक धोरण न राबविता केवळ स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी व लाभासाठी तीन वर्षांच्या कालावधीत तीन चेअरमन बदललेत आणि परत चेअरमन पदाच्या खुर्चीवर ताबा मिळविण्यासाठी पुन्हा रस्सीखेच झाली. मात्र सभासदच फुटल्याने सभासदांनी राजीनामा नाट्य सुरू केले आणि शेवटच्या वर्षाच्या कालावधीत संस्थेवर प्रशासक बसले.नावलौकिक मिळविलेल्या संस्थेवर अशा स्वार्थी राजकीय लोकांमुळे संस्थेवर प्रशासक बसण्याची नामुष्की ओढावली यामुळे संस्थेची नावलौकिक धुळीस मिळाली आणि असंख्य शेतकऱ्यांचा संस्थेवरचा विश्वास नाहीसा झाला. आता शासनाने स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घोषित करताच पातोंडा येथील संस्थेची निवडणूक लागली. आणि निवडणूकीचे वारे तापले.संस्थेच्या 13 जागांसाठी 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणूकीत चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण 8 जागांसाठी 26, महिला राखीव 2 जागांसाठी 7, इतर मागासवर्ग 1 जागेसाठी 5, अनु.जाती जमाती 1 जागेसाठी 4, भटक्या विमुक्त मागास प्रवर्ग 1 जागेसाठी 4 असे 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. संस्थेच्या नवीन नियमानुसार थकीत कर्जदार व कर्ज न घेतलेल्या शेतकरी सभासदांना मतदान करता येणार नसल्याने मतदारांची संख्या कमी आहे.यामुळे निवडणूक ही भाऊबंदकीच्या गठ्ठा मतदानावर विजयाचे भवितव्य ठरवणार आहे. आणि स्वतःच्या लाभापोटी नावलौकिक असलेल्या संस्थेत राजकारण करून संस्थेवर प्रशासक बसवून संस्थेचे नाव धुळीस मिळवणाऱ्या त्याच उमेदवारांना मतदार घरचा आहेर देतात की काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.