अमळनेर:- तालुक्यातील आठ मंडळातील उडीद व मूग लागवड केलेल्या पीकविमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई देण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले आहेत. कापूस व इतर पिकांबाबत ही लवकरच अधिसूचना निघणार असल्याची माहिती आहे.
अमळनेर तालुक्यातील आठही मंडळात एकवीस दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आली असून अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या ह्या वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्याने विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. उडीद आणि मुग या पिकांच्या क्षेत्रात विमा कंपनीचे प्रतिनिधी व शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत उत्पादनात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट असल्याचे दिसून आले. काही मंडळात उत्पादनात ८० टक्क्यांपेक्षा घट आल्याने ते नुकसान भरपाईस पात्र असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक ८ रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला पत्र देत उडीद व मूग उत्पादक शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम दोन महिन्याच्या आत प्रदान करावी असे आदेश दिले आहेत. तालुक्यातील सर्व आठ मंडळातील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.