अमळनेर:- माझ्या आपत्तीच्या काळात तुम्ही सर्वांनी जर मदत केली नसती तर माझे राजकीय पुनर्वसन झाले नसते अशा भावनिक शब्दात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर जनतेचे ऋण व्यक्त केले.
अमळनेर शहरातील सर्व संस्था व समाजातर्फे नागरी सत्कार समिती स्थापन करून बाजार समितीच्या आवारात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सत्काराला उत्तर देताना अनिल पाटील बोलत होते. व्यासपीठावर खा. उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, सभापती अशोक पाटील, अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते, तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , विनोद पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, ॲड ललिता पाटील, डॉ अविनाश जोशी, श्याम अहिरे, भोजमल पाटील, मातोश्री पुष्पाबाई पाटील, जयश्री पाटील, राजश्री पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील हजर होते.
मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की साहेबराव पाटलांनी त्याग केला नसता,स्व उदय वाघांनी मदत केली नसती तर मी आमदार झालो नसतो, अशी कबुली दिली. १४ कोटी जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या २९ मंत्र्यांमध्ये अमळनेरला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पाडळसरे धरणाच्या मातीचे सोने करेल, तालुक्याच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार आहे. ज्या खुर्चीवर जनतेने बसवले त्या खुर्चीची उंची वाढवण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. ते मी चोखपणे पार पाडेल. तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सिंचन वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी मतदार संघात धरणासोबत येत्या काळात ६० बंधारे झालेले दिसतील. सुरुवातीला मंत्री अनिल पाटील यांची घरापासून सजवलेल्या बैलगाडी वर मिरवणूक काढण्यात आली. सोबत २० बैलगाड्या सजवल्या होत्या. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबी मशीनने मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. अमळनेर नागरी समितीतर्फे मोठा हार व सन्मान चिन्ह देऊन अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर बाजार समिती संचालक व डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की अनिल पाटलांमध्ये प्रशासन हलवण्याची क्षमता आहे, खान्देशातील बॅकलॉग अनिल पाटील खेचून आणतील असा विश्वास आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले की, अजित पवारांचा अनिल पाटलांवर विश्वास आहे. अनिल पाटील यांना विविध क्षेत्रात कार्याचा अनुभव आहे.
स्मिता वाघ म्हणाल्या की, अमळनेर तालुक्याची वज्रमूठ बांधणे आपल्या हातात आहे. सत्तेचा उपयोग करून अनिल पाटलांनी वज्रमुठ बांधावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सभापती अशोक पाटील, ॲड ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अमळनेर तालुका मराठा समाज, मराठा समाज महिला मंडळ, खान्देश शिक्षण मंडळ, अर्बन बँक, नगरपालिका, ग्रामविकास शिक्षण मंडळ, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, विद्रोही साहित्य संमेलन समिती, जैन समाज, मुस्लिम समाज, कोळी समाज,ठाकूर समाज, लाडशाखीय वाणी समाज, अमळनेर स्मारक समिती, बडगुजर समाज, बौद्ध समाज, शिंपी समाज, यांच्यासह विविध समाज,संस्था ग्रामपंचायती यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डिंगबर महाले यांनी केले.