चाकुने वार केल्याने एका महिलेसह तिघांवर गुन्हा…
अमळनेर:- जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाच्या डोक्यावर लोखंडी रॉड तसेच कमरेवर आणि छातीवर चाकुचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक १० रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावर मंगळ महाराज मंदिराजवळ घडली असून तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मंगळग्रह मंदिराजवळ राहणारे रामकृष्ण रमेश पाटील हे १० रोजी रात्री आपला मित्र रतीलाल उर्फ पिंटू सुभाष पाटील याला सोबत घेऊन फिरायला गेला असता रामकृष्ण याच्याशी एक महिनापूर्वी भांडण झालेले सनी सुरेंद्र अभंगे (वय ३२), सचिन सुरेंद्र अभंगे (वय ३५), ज्योती जितेंद्र अभंगे (वय ४०) सर्व रा. कंजरवाडा चोपडा रोड यांनी कुरापत काढून वाद करत शिवीगाळ सुरू केली सचिनच्या हातात लोखंडी रॉड होता त्याने रामकृष्णच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर ज्योतीने हातातील सळईने रामकृष्णला मारहाण केली. त्याचवेळी सनीने हातातील धारदार चाकूने रामकृष्णच्या कमरेवर आणि छातीवर वार करून त्याला रक्तबंबाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिघांची दहशत असल्याने आजूबाजूचे लोक घराचा दरवाजा लावून लपून बसले. रमेश पाटील, बाळा पाटील, पिंटू व प्रमिलाबाई यांनी आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा सनीने त्यांनाही चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. पिंटूच्या फिर्यादीवरून सचिन, सनी व ज्योती यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.