
अमळनेर:– तालुक्यातील भोरटेक धानोरा अंतर्गत बिहार पॅटर्न अंर्तगत वृक्षलागवडीचे काम पारदर्शकपणे सुरू असताना गावातील दोन व्यक्ती वृक्षलागवडीच्या कामात अडथळा आणून मजुरांना व रोजगार सेवकास पैसे मागुन काम बंद करण्याची धमकी देत असल्याची तक्रार सदर काम करीत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरांनी अमळनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोघांकडून त्रास देण्याचा प्रकार खूपच वाढल्याने या सर्व मजुरांनी अमळनेर पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की या दोन्ही व्यक्ती रोजगार सेवक असलेले संदीप राजपूत यांच्या नावे खोटे अर्ज दाखल करीत असून रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांपैकी काही मजुरांची दिशाभूल करीत तुमचे पैसे काढून देतो असे प्रलोभन दाखवून त्यांच्या सह्या घेऊन व इतरांच्याही खोट्या सह्या व अंगठे घेऊन खोटे अर्ज दाखल केले जात आहेत. जेणेकरून रोजगार सेवक व मजूर यांच्या गैरसमज निर्माण होऊन स्वहित साधले जाईल हाच त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात मजुरांच्या कामाची मजुरी संबधित रोजगार सेवकाने वेळेत मिळवून दिली असताना वरील दोन्ही व्यक्ती विनाकारण अर्जफाटे करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासाठी संबंधित दोघांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मजुरांनी केली आहे.निवेदनावर लक्ष्मण भिल, माधवराव भिल, जयराम भिल, मोरचंद पवार, प्रवीण सोनवणे, शंकर भिल, सचिन सोनवणे, दीपक अहिरे, नामदेव भिल, जालम पवार,प्रदीप सोनवणे, भिकुबाई भिल, विजयाबाई भिल, लताबाई भिल, राजकोरबाई भिल, ज्योतिबाई पवार, सुमनबाई पवार, ताराबाई पवार, मंगलबाई भिल, सुशीलाबाई भिल, रेखाबाई सोनवणे यासह अनेक मजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदर तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी जळगाव,जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव, अमळनेर तहसीलदार, रोजगार हमी योजनेचे अधिकारी व मारवड पोलीस ठाण्याच्या सहा. पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.




