ग्रामपंचायतीत कोंडत केले पोलिसांच्या हवाली, बाम्हणे येथील घटना…
अमळनेर:- मद्यधुंद अवस्थेत चारचाकी गाडी चालवून म्हशीला टक्कर देवून निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडत ग्रामपंचायतीत कोंडून ठेवल्याची घटना बाम्हणे येथे दिनांक १६ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या स्विफ्ट गाडी (क्रमांक एमएच २८ बीक्यू ८०५९) च्या चालकाने झाडी गावाजवळ म्हशीला जोरदार धडक दिली. त्यात म्हैस जागीच ठार झाली. त्यानंतर त्यांनी लोण व मूडी येथे भरधाव वेगाने वाहन चालवल्याने मूडी येथील एका दुचाकीस्वाराला धक्का लागून तो किरकोळ जखमी झाला. त्यानंतरही त्याने वाहन न थांबवल्याने झाडी, लोण व मूडी येथील ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला असता तो सुसाट गाडी पळवू लागला. यावेळी या ग्रामस्थांनी बाम्हणे येथे संपर्क साधत माहिती दिल्याने बाम्हणे ग्रामस्थांनी गावाबाहेर ट्रॅक्टर आडवे लावले. सदर वाहनचालकाला पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने त्याने आपले वाहन शेतात वळविले. मात्र चिखलात गाडी अडकल्याने वाहनचालक भीतीने कपाशीच्या शेतात लपून बसले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना शोधून पकडत बाम्हणे गावात आणले असता त्याठिकाणी लोण, मूडी, झाडीसह स्थानिक नागरिक जमल्याने मोठा जनसमुदाय त्याठिकाणी जमला होता. दोन्ही मद्यधुंद अवस्थेत असल्याने जनप्रक्षोभ वाढत चालला होता. सुज्ञ नागरिकांनी वाहनचालक व त्याच्या साथीदाराला ग्रामपंचायतीत कोंडत पोलिस पाटील गणेश भामरे यांना कळविले. भामरे यांनी सपोनि शितलकुमार नाईक यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची कल्पना देत घटनास्थळ गाठले. सपोनि शितलकुमार नाईक, हेकॉ बागवान, पोकॉ भरत गायकवाड, पोकॉ दिनेश पाटील, पोलीस पाटील गणेश भामरे यांनी जनप्रक्षोभ शांत करत त्या दोघांना पोलीस ठाण्यात रवाना केले. पोकॉ महाजन यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक दिनेश उखा पाटील (रा. उपरपिंड ता. शिरपूर) व त्याच्या साथीदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पो कॉ भरत गायकवाड करीत आहे.