
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा ग्रामस्थांची ग्रामदैवत व पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धास्थान असलेली आदिशक्ती माहिजी देवीच्या पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साधा पद्धतीने भजनी मंडळाच्या गजरात संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा पार पडला.
वर्षाच्या सुरवातीला पौष महिन्याच्या चतुदर्शीला माहिजी मातेचा पालखी सोहळा दरवर्षी वाजत गाजत भाविकांच्या उपस्थितीत गावाला प्रदक्षिणा घालून पार पडतो. मात्र मागील वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व आता पुन्हा कोरोनाने वर डोके काढल्याने पालखी सोहळा साध्या पध्दतीने काढण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले.दरवर्षी पौष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा भरत असते. यात्रेत दूरदूरवरून व्यापारी व किरकोळ विक्रेते यात्रेत दाखल होत असतात. पंचक्रोशीतील भाविक यात्रेत येऊन माहिजी मातेचे दर्शन घेत असतात. चतुदर्शीला विविध भाविक मान व नवस फेडत असतात. सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर सावट येत असल्याने ग्रामस्थ व भाविकगण निराश झाले आहेत.




