अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळेसह परिसरात झालेल्या रिमझिम, भीज पावसानंतर वातावरणात उष्णता असल्याने कपाशी पिकांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी पाने मागील बाजूने लाल होत आहे. तर पानगळ, फुलगळ व कैरीची गळ होत आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मध्यंतरी महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली होती. दरम्यान मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला होता. या पावसामुळे पिके टवटवीत झाली असली तरी कपाशीवर थ्रिप्स रोगाची लागण झाली आहे. यामध्ये कपाशी पिकाचा शेंडा पिवळा पडत असून पानांची मागील बाजू लाल पडत आहे. यामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. सध्या चिमनपुरी पिंपळे भागामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड फिकट पिवळ्या रंगाची असून पानांच्या मागच्या बाजूला आढळते व पानांमधील रसशोषण करते. ज्यामुळे अन्नप्रक्रिया मंदावते परिणामी याचा उत्पादनावर परिणाम होतो.चिमनपुरी पिंपळेसह परिसरातील कपाशीवर अशा प्रकारे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.