तालुका विधी सेवा समिती व ग्रामीण रुग्णालय यांच्या विद्यमाने आयोजन…
अमळनेर:- येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात एचआयव्ही आणि इतर शारीरिक रित्या संक्रमित रोगांच्या रुग्णांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरास अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. के. आर. बागुल, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी. पी. परमार, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. ताडे, डॉ. संदीप जोशी यांची उपस्थिती होती. ग्रामीण रूग्णालय, अमळनेर येथे एचआयव्ही आणि इतर शारीरिकरित्या संक्रमित रोगांच्या रूग्णांसाठी कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. या शिबिरात डॉ. संदीप जोशी यांनी एचआयव्ही व एड्स यामधील फरक समजावून सांगितला. तसेच एचआयव्ही व एड्स हा आजार कशाप्रकारे होतो व त्याची लक्षणे कोणती याबाबत माहिती दिली. तसेच एचआयव्ही. चाचणी ग्रामिण रुग्णालयात मोफत करण्यात येते व त्याचा अहवाल हा गोपनीय ठेवण्यात येतो. याकरिता ग्रामिण रुग्णालयात एआरटी सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली असून येथे एचआयव्ही बाधीत रूग्णांसाठी मोफत वैद्यकीय चाचणी, औषधोपचार व समुपदेशक यांच्यामार्फत करण्यात येते. तसेच एचआयव्ही संसर्गजन्य नाही याबाबत माहिती दिली.यावेळी एचआयव्ही, एड्स कशामुळे पसरतो. त्यावरील उपचार याबाबत सखोल माहिती दिली. शिबीरास ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी व रूग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबीराचे नियोजन व व्यवस्थापन तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ सहाय्यक संदीप सोनवणे, शिपाई निलेश पाटील ग्रामीण रुग्णालयाचे ए. आर. टी. सेंटरचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.