प्रताप हायस्कूल येथे साने गुरुजींनी अध्यापन केल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली मागणी…
अमळनेर:- महापुरुषांशी निगडीत शाळांना दिलेल्या अर्थसहाय्य योजनेत पू. सानेगुरुजींनी अध्यापन केलेल्या अमळनेरच्या प्रताप हायस्कुलचा समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संजय पाटील यांनी केली आहे.
अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी असून येथील प्रताप हायस्कुल मध्ये सानेगुरुजींनी अध्यापन केले होते. म्हणुनच अमळनेरला साने गुरुजींची कर्मभूमी म्हणुन ओळखले जाते. याच कर्मभूमीतून खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असा प्रेमाचा संदेश साने गुरुजींनी दिला. तसेच आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान असे आवाहन करीत खान्देश भूमीत क्रांतीची मशाल पेटविली होती. बलसागर भारत होवो, विश्वास शोभूनी राहो म्हणत युवकांना प्रेरणा दिली होती. त्यांच्या एका आवाहनानंतर १९४२ ला स्वातंत्र सैनिक उत्तमराव पाटील व लिलाताईंनी अमळनेरात देशातील सर्वात मोठे जळीतकांड घडवले होते. याच मातीतुन त्यांनी कामगारांसाठी, देशासाठी लढा दिला होता. त्यांच्या विचारांचा पगडा आजही खान्देशच्या मातीवर आहे. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे असा संदेश देवून त्यांना विद्यार्थ्यांचा लळा लागला होता. नुकतेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांच्या मार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नगर, नाशिक, आदि भागातील शाळांचा समावेश आहे. मात्र खान्देशातील एकही शाळेचा समावेश नाही. साने गुरुजींसारख्या थोर स्वातंत्र सेनानी, आदर्श शिक्षक व महापुरुषांशी निगडीत असलेल्या प्रताप हायस्कुल या शाळेचा समावेश नसणे ही अन्याय कारक बाब आहे. म्हणून खान्देशचा अनुशेष भरून काढण्यासाठी येथील प्रताप हायस्कुल या शाळेला देखील सांस्कृतीक व पर्यटन विभागातर्फे अर्थ सहाय्य मिळावे, अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे.