
काव्यस्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न, नवोदित लेखक व कवींना केले मार्गदर्शन…
अमळनेर:- आपल्या साहित्यात आईवर अनेक प्रकारचे लिखाण झाले होते. मात्र कुटुंबाचा आधार असलेला “बाप” साहित्यात उपेक्षितच होता. आता बापावरही साहित्यकृती निर्माण होऊ लागली आहे. मसापच्या अमळनेर शाखेने “बाप” या विषयावर घेतलेली काव्यस्पर्धा व त्यातील कवींचा सहभाग कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मसापचे जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य आबासाहेब तानसेनजी जगताप यांनी केले. काव्यस्पर्धेच्या बक्षिस वितरण व कवी संमेलन प्रसंगी ते बोलत होते.

मसाप अमळनेर शाखेने जागतिक पितृ दिनानिमित्त व स्व. नारायणदास तेजकरण मुंदडा स्मृतीप्रित्यर्थ “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच करण्यात आले. तसेच कवी रमेश पवार यांच्या कवीतांच्या डॉ.रमेश सुर्यवंशी अनुवादित “बाप” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य तानसेनजी जगताप,
उद्योजक नरेंद्र मुंदडा,सेवानिवृत्त तहसीलदार व कवी सुदाम महाजन,ॲड. विलास मोरे (एरंडोल), डॉ.रमेश सुर्यवंशी (कन्नड), मसापचे अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक हे उपस्थित होते.
प्राचार्य जगताप यांनी आपल्या मनोगतात नवोदित लेखक व कवींना मार्गदर्शन केले. तहसीलदार सुदाम महाजन म्हणाले की, सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आज या ठिकाणी बाप विषयावर कवी संमेलन होत आहे हा एक दुर्मिळ योग आहे. ॲड. विलास मोरे, डॉ.रमेश सुर्यवंशी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. रमेश पवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली व उद्योजक ओमप्रकाश मुंदडा यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उद्योजक नरेंद्र मुंदडा यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेते – प्रथम – योगिता पाटील (चोपडा), द्वितीय – प्रकाश पाटील (पिंगळवाडे), तृतीय – दत्तात्रय कुळकर्णी (जामनेर),उत्तेजनार्थ – जयराम मोरे (सोनगीर), गो.शि. म्हसकर (नगरदेवळा), रमेश धनगर (गिरड) यांना बक्षिसे देण्यात आली तर यासह कवी जितेंद्र कुंवर (जळगाव),माला सोनवणे (कुसूंबा,चोपडा),संगीता बोरसे(चोपडा),विलास पाटील (चोपडा) असे एकूण गुणानुक्रमे दहा कवींचे सुदाम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. कवींनी आपल्या कवितेतून बापाच्या व्यक्तिमत्वाची विविध रूपे उलगडून दाखवली. यावेळी वातावरण अतिशय भावनिक झाले होते. कार्यक्रमास उपाध्यक्ष शरद सोनवणे,सदस्य गोकुळ बागुल,निरंजन पेंढारे, सौ.विजया गायकवाड यांच्यासह रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रमेश माने यांनी केले.




