सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील श्री दत्त विद्या मंदिरातील इतिहास व भूगोल विषय शिकविणारे माध्यमिक शिक्षक प्रदिप लोहारे हे ज्ञानदानाबरोबरच आपल्या राहत्या रायगड घरात ऐतिहासिक, भौगोलिक, पुराणिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक व प्रेरणादायी पुस्तकांचा ठेवा घरात जपत असून एक आगळावेगळा उपक्रम ते काही वर्षांपासून जपत असून पुस्तकामध्येच जीवनाचे सार्थक असून घरातच ज्ञानमंदिर उभारल्याने त्यांच्या या कृत्याचे सर्वदूर कौतुक होत आहे.
प्रदीप लोहारे हे श्री दत्त विद्या मंदिरातील शिस्तप्रिय, हुशार शिक्षक असून त्यांचा इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयावर मोठा पगडा आहे. त्यांच्या शिकवण्याच्या लयीतुन आणि शिस्तबद्ध कठोर वागण्यातून त्यांनी खूप सारे विद्यार्थी घडवून आणले आहेत. शिक्षक सेवेत त्यांनी स्वतःला झोकून प्रामाणिकपणे शिक्षण देत आहेत.स्वतःला शिस्तबद्ध करून शाळेत नियमितपणे तासिका घेणे, वेळेवर येणे,राजकारणाशी दोन हात ठेवून फक्त शिक्षण आणि विद्यार्थी एवढीच सांगड त्यांनी आपल्या जीवनात ठेवली. त्यामुळेच ते आजही पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचे आदर्शवत शिक्षक आहेत. त्यांनी नुकतेच नवीन सदनिका बांधून त्या सदनिकाचे नाव रायगड व राजगड ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रेम दाखविले. त्यासोबतच त्यांनी आपल्या खोलीत सर्व राष्ट्रपुरूष, क्रांतीकारक, उत्तम प्रशासक, स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले अशा अनेक महापुरुषांच्या प्रतिमा संगतवार व दर्शनी ठिकाणी लावलेल्या आहेत.तसेच पुस्तके हे ज्ञानाची पंढरी आहे त्याप्रमाणे त्यांनी घरातच गृह वाचनालय उभारले असून जणू घर हे ज्ञानाने सुगंधित आणि भरभरून वाहत आहे. यातूनच त्यांची व्यासंग व अभ्यासु वृत्तीचे दर्शन दिसून येते. त्यांच्या व्यक्तीदर्शनातून राष्ट्र, सर्वधर्मसमभाव या सद्गुणांचे प्रतीक, गावातील कोणत्याही अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीत त्यांचा विशेष सहभाग आवर्जून असतो. घरातील सर्व ज्ञानरुपी पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केलेला असून घराला शोभून उठणारे पुस्तकांचे संग्रहालय ते जपत आहेत.जणू काही त्यांचा घरातील परिसर वैराग्याचा प्राचीन वारसा सांगणारा विलोभनीय आश्रम आहे. त्यांचे वडीलही जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते आणि त्यांना त्या काळात आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त होता आणि त्यांच्या धर्मपत्नी ह्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असून मागील वर्षीही त्यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. घरालाच आदर्श शिक्षकांचा वारसा लाभलेला असून त्यांच्या ह्या आदर्शवादी,कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर शिक्षकाचा ह्या प्रेरणादायी उपक्रमाचे ग्रामस्थांकडून व शिक्षण प्रेमींकडून कौतुक होत आहे.