अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे भाविकांना नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हाळसादेवीचे एक जागरूक देवस्थान असून या देवीचे मूळ स्थान जेजुरी व अर्थे येथील असून तेथून येथे या देवीची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली असून अल्पावधीतच या देवीच्या आजूबाजूचा परिसर गजबजू लागला आहे.
शिरसाठ परिवारातील भाविकांची ही देवी कुलस्वामिनी असून जवळ जवळ पंधराशे ते सोळाशे पूजक या कुलस्वामिनी चे नित्यनियमित या गावातील आहेत. तसेच चौबारी, लोंढवे, वालखेडा, डांगरी व इतर तालुक्यातील भाविक नवरात्र व दसरा या कालावधीत या देवीच्या दर्शनाला येत असतात. या देवीच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण असल्याने 70 ते 80 वेगवेगळ्या प्रकारची झाडे या परिसराची शोभा वाढवून देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आकर्षित करतात. या देवीच्या सभा मंडपाच्या कामासाठी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी दहा लाखाचा निधी दिला होता. तसेच या देवीचे धार्मिक क्षेत्र क वर्गात गेल्याने तीर्थक्षेत्र विकास निधी म्हणून पंधरा लाख मंजूर असून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वीस लाखाचे सभागृहाचे काम प्रस्तावित केले आहे. तर पंचायत समिती उपसभापती भिकेश पावभा पाटील यांनी भाविकांना बसविण्यासाठी बाक दिले आहेत. माजी जि प सदस्य कविता शिवाजी पाटील माजी सभापती आशाबाई ठाकरे तसेच संदेश पाटील यांनी काँक्रिटीकरणाला मदत केली होती. तसेच या गटातील जि प सदस्य संगीता भील यांनी लाईटसाठी निधी दिला होता .अशा प्रकारे अनेक भाविकांनी येथील देवस्थानाला सरळ हाताने मदत करत असतात. आतापर्यंत या देवीच्या साक्षीने गावातील हजारो लग्न सोहळे झाले असून अनेक भागवत कथांचे आयोजन करण्यात आले आहे. या देवीच्या परिसरातील बोअरवेल असून उन्हाळ्याच्या दिवसातही येथील परिसर हिरवागार असतो. या देवीच्या पूजेसाठी पुजारी म्हणून संजय कुलकर्णी हे नित्यनेमाने काम पाहत असतात.