हमरीतुमरी आणि भ्रष्टाचाराच्या विषयाने गाजली सभा, चहाची डायरी बंद, अन् काजू बदामाची सुरू ???
अमळनेर:- यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा झेलत असून तर दुसरीकडे त्यांच्याच जीवावर चालणाऱ्या बाजार समितीच्या सभेत संचालक काजू, बदाम, पिस्ता, चिवड्यावर ताव मारत बाजार समितीच्या विकासाच्या पोकळ गप्पा झोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हमरी तुमरी आणि अरेकारेवर भाषा झाल्याने काही संचालकांनी एकमेकांच्या इज्जतीचे वाभाडे काढल्याची चर्चा आहे.
बुधवारी अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेला निवडून आलेल्या संचालकांनीच उपस्थित राहिले पाहिजे, असा नियम आहे. मात्र एका महिला संचालकाच्या पती देवाने या सभेला हजेरी लावली होती. त्यामुळे याला संचालक सचिन पाटील यांनी कडाडून विरोध केला. मुद्द्यावरून सुरू झालेली ही सभा हमरीतुमरीवर आली. आणि अखेर त्या संचालक पतीला माघारी फिरावे लागले. तर सभेच चर्चासत्र सुरू असतानाच एक सदस्याने सह्या करा आणि सभा संपवा असे सांगितल्याने त्यालाही सचिन पाटील यांनी चांगलेच खडेबोल सुनावले, तुम्हा घाई असेल तर तुम्ही सही करा आणि निघून जा, येथे सभा सुरू असल्याने महत्त्वाचे विषय चर्चीले जात आहे, असे सुनावले. सभेत मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे, आलेल्या महात्त्वाच्या पत्रव्यवहाराची नोंद घेणे, सप्टेंबर २०२३ चा जमा खर्च वाचून मंजूर करणे, सन २०२३-२४ या वर्षाचा पुरवणी अर्थसंकल्प तयार करणे, सन २०२१-२२ ऑडिट रिपोर्ट दोष दुरुस्ती अहवालाबाबत विचार विनियम करणे, छपाईचे कोटेशन, इलेक्ट्रिसीटी कोटेशन, बाजार समिती आवारात किरकोळ दुरुस्ती, सोलर सिस्टीम वर्क ऑर्डर देणे आदी विषय अजेंड्यावर होते.
चहा पाण्याची डायरी बंद, अन् काजू, बदामाची सुरू?
नव्याने निवडून आलेल्या संचालकांनी शेतकऱ्यांचा घामाचा पैसा वायफळ खर्च करणार नाहीत, अशी शेकी मिरवत बाजार समितीची चहापाण्याची डायरी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र बुधवारी झालेल्या सभेत संचालकांनी काजू, बदाम, चिवडा, पिस्ता खात बाजार समितीच्या विकासाच्या गप्पा झोडल्या. एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळला जाऊन उपाशी मरत आहे. तर दुसरीकडे संचालक मंडळ काजू, बदाम, पिस्ता, चिवडा खाऊन तुपाशी राहत आहे. चहापाण्याची डायरी बंद केली. मग काजू, बदामाची डायरी सुरू केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभेचा खर्च हा ईतर खर्चामध्ये टाकला जातो. म्हणजे काजू, बदामाचा खर्चही त्यात टाकला जाऊन शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाची जणू ही उधळपट्टीच असल्याचे बोलेले जात आहे. याबाबत सभापती अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल होते.
भ्रष्टाचाराची होणार चौकशी, समिती गठीत…
सभेत अजेंड्यावरील आठव्या क्रमांकाचा विषय हा बाजार समितीतील रिक्त पदांवर पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि बिंदू नामावली नियमित करून नवीन पदभरती परवनागी घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. यात प्रफुल्ल पाटील म्हणाले यात पैशांचा व्यवहार झाला, अशी चर्चा आहे. शंका आहे, असा आरोप केला. त्यामुळे याची चौकशी लावा, असे आव्हान सभापतींनी दिले. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी सर्व संचालकांचे एकमत होत सन २००५ पासून ते २०२३ पर्यंत चौकशी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यात विद्यमान मंत्री अनिल पाटील आणि भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ हेही सभापती होते. त्यामुळे आता ही चौकशी होऊन त्यात काय बाहेर पडते, याकडे लक्ष लागून आहे. कोणी कसा भ्रष्टाचार केला आहे, याची चौकशी होणार आहे. मात्र अश्या प्रकारांमुळे बाजार समितीची व परिणामी तालुक्याची बदनामी होत असल्याने मंत्री अनिल पाटील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शेतकरी दुष्काळाने व्याकूळ तर संचालकांचा काजू, बदामावर ताव…
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. यात त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत. शेतकरी दुष्काळाने व्याकूळ झालेला आहे. उपाशी मरतोय. तर दुसरीकडे संचालक हे काजू, बदाम खात आहेत. सुरुवातील चहापाण्याची डायरी बंद केल्याचे सांगितले. तर आता काजू, बदामाचा खर्च करून तो इतर खर्चात टाकला जाणार आहे. ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. हे काही खपवून घेणार नाही, याविरोधात आपला संघर्ष कायम राहणार आहे.
– सचिन बाळू पाटील, संचालक, बाजार समिती अमळनेर
सभेत भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यासंदर्भात चर्चा…
बाजार समिती संचालकांची सभा झाली आहे. परंतु या सभेचे अद्याप प्रोसिडिंग कच्ची आहे. ती सभापती यांच्याशी चर्चा करून लिहिली जाईल. त्यात भ्रष्ट्राचाराची चौकशी लावण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. परंतु सभापती सांगतील तर होईल, तसे अजून निश्चित नाही.
–उन्मेष राठोड, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर