जळोद येथे तापी नदीकडे जाणारा वाळू वाहतुकीचा रस्ता जेसीबीने काढला खोदून…
अमळनेर:- चोरट्या वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे महसूल प्रशासनाला अवघड झाले आहे. मात्र जळोद येथील तलाठ्याने तापी नदीवरून अवैध वाळू वाहतुकीचा रस्ताच खोदून काढल्याने वाळू चोरीवर नियंत्रण मिळवले आहे.
अमळनेर तालुक्यातील जळोद हे गाव तापी नदीच्या खोऱ्यात वसले असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असते. वाळू चोर शिरजोर झाल्याने त्यांना पकडणे जवळजवळ अशक्य झाले आहे. महसूलचे पथक पकडायला निघाले तर वाळू चोरांचे खबरी लगेच खबर देत असल्याने ते सावध होऊन नदी पात्रातून पळ काढतात. एकटा तलाठी आणि गावातील कोतवाल काहीच करू शकत नाहीत. एखादे ट्रॅक्टर सापडले तर वाळू चोर धक्काबुक्की, दादागिरी करून पळून जातात. वेळप्रसंगी जीवावर बेतत असल्याने रात्री अपरात्री, २४ तास महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाही. तसेच वाळू चोरांच्या तुलनेत प्रशासनाकडे मनुष्य बळ अपूर्ण पडत आहे. म्हणून तलाठी जितेंद्र पाटील याने शक्कल लढवली असून कोतवाल प्रवीण शिरसाठ यांच्या मदतीने तापी नदीकडून गावाकडे येणारा रस्ताच खोदून काढला. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकदारांची कोंडी झाली आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने एकही वाहन नदीवर जाऊ शकत नाही. परिणामी चोरी पूर्णपणे थांबली आहे. यानंतर जे वाळू वाहतूकदार रस्ता बुजवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले.