अमळनेर:- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७ रा जुना पारधीवाडा) यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून २० रोजी पहाटे त्याची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनही सुधारत नसल्याने हि कारवाई करण्यात आली असून तन्वीर शेख हा व्यापारी व पेट्रोलपंप मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, रात्रीच्या वेळी बंद घरात घरफोडी, चोरीचे सात गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, हिंदू मुस्लिम दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्तनात सुधारणा नसल्याने त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून अखेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी प्रस्ताव पाठवून पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , डीवायएसपी सुनील नंदवाळकर , एलसीबी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या सहकार्याने एक एक करत सहाव्या गुन्हेगाराला एमपीडीए कारवाई करून २० रोजी पहाटे ठाणे कारागृहात रवाना केले आहे. अमळनेरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शहरात शांतता आहे. नागरिकानी सुटकेचा श्वास घेतला असून पोलिसांचे अभिनंदन केले आहे.