उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अनंत निकम यांचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध मार्गाने गौण खनिज उत्खनन होत असून एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गौण खनिज माफीयांना आळा घालावा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अनंत रमेश निकम यांनी दिला आहे.
निकम यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अंबाऋषी टेकडी परिसरातील शासकीय जागा, सबटेशनच्या मागील बाजूस गौण खनिज माफियांनी प्रचंड प्रमाणात मुरुम उत्खनन केलेले आहे. सकाळी ३ वाजता मुरुम माफीया हे कृत्य तडीस नेत आहेत. त्यात शहर तलाठी व त्यांच्या अखत्यारीत पथक काय करीत आहेत ? असा प्रश्न चिन्ह उद्भवत आहे. त्या संदर्भात तात्काळ जागेवर जावून पंचनामा करून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. अमळनेरपासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर हेडावे गावाच्या पुढे उजव्या हाताला फॉरेस्टच्या जमिनीच्या समोरील डोंगर पोखरून बहुतांश मुरुम हा रातोरात वाहतूक करण्यात आला असून, शासनाला व शासनाच्या नियमांना धाब्यावर ठेवून महसुल खात्याला लाखोंचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार प्रथम दर्शनी स्पष्ट उघड दिसत आहे. तसेच संबंधित शेत गट धारकाजवळ आपल्या महसूल खात्याकडून कुठलाही खानपट्टा देण्यात आलेला नाही, हे समजते. हेडावे गाव क्षेत्रामध्ये विविध ठिकाणावरून मुरुम उत्खनन सर्रास सुरु आहे. रॉयल्टीची पावती १०० ब्रासची असेल तर ३०० ब्रास मुरुम उत्खनन केलेले आढळते. त्या संदर्भात तात्काळ पंचनामा करुन आपल्या स्तरावरुन गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
पातोंडा गटातून रोज धावतात १५ ते २० ट्रॅक्टर…
पातोंडा गटातून सावखेडा मार्गे पहाटे ४ वाजता रोज सुमारे १५ ते २० ट्रॅक्टर धरणगाव क्षेत्रात जातात. याबाबत पातोंडा सर्कल व सावखेडा येथील तलाठींना कल्पना नसेल का ? सर्व आलबेल चालु आहे. अमळनेर तालुक्यातील गौणखनिज विभाग हा झोपा काढतो आहे का ? असा प्रश्न असून शासनाचा गले लठ्ठ पगार घेवून शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणाऱ्यांबरोबर हात मिळवणूक केल्यासारखे स्पष्ट चित्र दिसत आहे. सर्व खेळ चिरी-मिरीचा दिसत आहे.
नियुक्ती झाल्यापासून एकही कारवाई नाही…
मागील तहसीलदार, प्रांत, सर्कल, शहर तलाठी यांनी गौणखनिज माफीयांचे ट्रॅक्टर, डंपर जमा करुन त्यांचावर दंड वसुल केल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. ती तरी चाळून बघा, आपली नियुक्ती झाल्यापासून एकही कार्यवाही गौणखनिज माफीयांवर होत नाही याचा अर्थ काय समजावा. म्हणून आपण लवकरात लवकर गौणखनिज माफियांवर शासकीय कायद्याचा बळगा न उगारलास व आडकाठी न केल्यास तहसिल कार्यालयासमोर संविधनिक मार्गाने शासनाचा महसुल चोरी संदर्भात उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही निकम यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.