बाल व कुमार वयातील मुलांसाठी असलेले शहरातील पहिलेच वाचनालय…
अमळनेर:- वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथे दि. १५ ऑक्टोबर रोजी शारदा बाल-कुमार वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. फक्त बाल आणि कुमार वयातील मुलांसाठी असलेले हे अमळनेर मधील पहिलेच वाचनालय आहे.
वाचताही न येणाऱ्या छोट्यांसाठी चित्ररूप गोष्टींच्या पुस्तकांपासून ते शालेय मुलांसाठी मनोरंजक, ज्ञानवर्धन पुस्तके अशा मराठी भाषेतील शेकडो पुस्तकांचा खजिनाच या वाचनालयात असून अशा पुस्तकांच्या वाचनातून मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांच्या कल्पनाशक्तीचा, एकाग्रतेचा, शब्दसंपत्तीचा आणि बुद्धीचाहि विकास होतो. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली तर होतेच आणि त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा विकसित होते. पुण्यातील गरवारे बाल भवन, ज्योत्स्ना प्रकाशन, दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यासारख्या अतिशय दर्जेदार प्रकाशनाची पुस्तके इथे उपलब्ध असून लहानांनाच नाही तर आई-बाबा, आजी-आजोबा यांनाही हि पुस्तके वाचताना वाचून दाखवताना खूप आनंद मिळू शकेल. या उद्देशानेच क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. जयदीप साळी आणि सौ कल्पना साळी यांच्या संकल्पनेतून या वाचनालयाची निर्मिती त्यांच्या अमळनेर येथील पाटील कॉलनीतील निवासस्थानी झाली आहे.